मैत्र जिवाचे...!
मैत्र जिवाचे...!
माणूस
हा भावनाशील प्राणी आहे. भावनांचे बीज पेरत जीवन फुलवीत जाणारा माणूस जगभर संचरला
आहे. यातूनच एक घट्ट धागा विणला गेला आहे आणि तो कोमल, सुंदर , हृदयंगम धागा
म्हणजे मैत्री! आत्तापर्यंत आणि इथून पुढेही मैत्रीवर अनेक कथा, कादंबरी, काव्य,
नाटके निर्माण झाली, होत राहतील! मैत्रीची अनेक उदाहरणे जगणे पहिली आहेत.
स्वतःपेक्षाही मित्राची काळजी घेणारे मित्र आणि त्यांच्याद्वारे मैत्री अजरामर
झाली आहे. मैत्री म्हणजे समर्पण! मैत्री म्हणजे नवजीवन! मैत्री म्हणजे श्वास आणि उच्छवास!
आत्तापर्यंत मैत्रीनेच जग जुडले आहे. सत्ता, संपत्ती, वय, जात, धर्म, पंथ, लिंग,
देश इत्यादींच्या पलीकडे एक अलौकिक भावनाविष्कार म्हणजे मैत्री! मैत्री म्हणजे
आधार! मैत्री म्हणजे शुद्धता, निर्मळता! मैत्री प्रेमाच्याहि पलीकडचे अवीट नाते.
मैत्री, जिथे सर्व मानवी बंध अनिर्बंध होऊन ओसंडून वाहतात तेथून मैत्रीचा निखळ
प्रवाह वाहत असतो.
मैत्रीवर
अनेकांनी आपले अनमोल, चिंतनगर्भ शब्द खर्च करतांना जीवनात मैत्रीला अनन्यसाधारण
महत्व दिलेले आढळून येते. स्वार्थ हा मैत्रीचा शत्रू! गुळाला चिकटलेले मुंगळे
गुळाचे मित्र असूच शकत नाहीत. आपला जिवलग मित्र राजदरबाराच्या उंबरठ्यावर आलेला
कळताच अनवाणी पायाने पळणारा कृष्णसखा म्हणजे मैत्रीचे अत्युच्च प्रतिक! स्वतः राजा
असतांना मित्राला आपल्या राजसिंहासनावर बसवून आदरातिथ्य करणारा सर्वोच्च मित्र
श्रीकृष्ण! महान तमिळ संत थिरुवल्लुवर आपल्या जगप्रसिद्ध कुरल ग्रंथात मैत्रीवर
लिहितांना, "केवळ हसरा चेहरा म्हणजे मैत्री नव्हे, त्यासोबत मन-हृदयही हसायला
हवे. मैत्री, ऱ्हासापासून वाचवतांना सन्मार्गाने नेते. दुःखात दुःखी आणि सुखात
सुखी, तीच खरी मैत्री!" असे महान विचार लिहून मैत्री करणारांना सावधान करतात.
दुसरीकडे सम्राट भृतहरी आपल्या जगप्रसिद्ध नीतिशतक ग्रंथात मैत्रीविषयी
पापान्निवारयति
योजयते हिताय गुह्यं च गूहति गुणान् प्रकटीकरोति ।
आपद्गतं
च न जहाति ददाति काले सन्मित्रलक्षणमिदं प्रवदन्ति सन्तः॥
मित्र,
तुम्हाला पापापासून परावृत्त करतो. मित्र, तुमच्या हितासाठी तत्पर असतो. मित्र,
तुमची गुपिते, रहस्य गुप्त ठेवतो. मित्र, तुमच्या गुणांना प्रोत्साहित करतो,
संकटात सोबत असतो, गरजेच्या वेळी धावून येतो तोच खरा मित्र! एवढे महान विचार आपण
अंगिकारले पाहिजेत. मित्र जोडतांना सर्वप्रथम आपण मैत्र्यभाव हृदयात खोलवर जपले
पाहिजेत. राम-सुग्रीव, दुर्योधन-कर्ण इत्यादी मैत्रीची उदाहरणे जगणे पहिली आहेत.
मित्रहो, वर्तमान मोठा डळमळीत आहे. आज जातीय
अभिनिवेश तीक्ष्ण वाटत असले तरी आपण सर्वांनीच आपआपली मैत्री अभ्येद्य ठेवली
पाहिजेत. स्वार्थ, विकाराच्या पलीकडे जाऊन आपण मैत्री जपूया! त्यासाठी संत तुकोबाराय
मैत्रीसाठी
चित्त
शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥
विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥
अनमोल
शब्द लिहून आसमंत जागृत करतात. तेंव्हा चला मित्रहो, शुद्ध सात्विक चित्त, हृदय,
मनाने अलौकिक मैत्री जपूया! सर्वांना जागतिक मैत्री दिनाच्या अनंत शुभेच्छा!
Comments
Post a Comment