राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

 

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

माणूस नावाचा प्राणी शेवटपर्यंत माणसाला कळला तर ते जगातील सर्वात मोठे संशोधन असेल! कितीही प्रयत्न केले तरी माणसातील विकार संपतील का? हा प्रश्न अनेक महामानवांनी, दर्शनीकांनी उपस्थित केलेला आढळून येतो. माणूस मोठा स्वार्थी आणि मतलबी असल्यामुळे त्याने आत्तापर्यंत सृष्टीतील सर्वच गोष्टींचा केवळ त्याच्या स्वार्थासाठी पुरेपूर उपयोग केलेला दिसतो. त्यातच एखाद्या महापुरुषाला देव केले, त्याची मूर्ती करून मंदिरात प्रतिष्ठापना केली, त्याची पूजा-अर्चा, आरती झाली की माणूस त्याला हवं तसं काम करायला आणि त्या मूर्तीचा हवा तसा उपयोग करायला मोकळा!

कोणत्याही गोष्टीचे धर्माच्या नावाखाली भावनिक चित्रण केलं की भोळी, भाबडी, साधी, निरागस, देवाला भिनारी बिचारी माणसं देवाच्या नावाखाली जे सांगाल ते ऐकायला आणि करायला तयार. असं असलं तरी आज राज्यात होणाऱ्या किळसवाण्या घटना पाहून मन प्रचंड व्यथित होतं. उच्चशिक्षित, उच्चभ्रू, श्रीमंत कुटुंबातील आणि विविध राजकीय आणि शासकीय पदावर असलेल्या लोकांनी आपला विवेक अक्षरशः थोतांड आणि कर्मकांड या समोर गहाण टाकलेला पाहून मन विषन्न, व्यथीत होते. त्यातच आज आयोध्येचा कृतीशील राजपुत्र राजा श्री रामचंद्र यांची जयंती! बदलत्या काळानुरूप माणसाने सर्वच प्रतिकांचे आणि प्रतीकात्मकतेचे अवडंबर पसरवून सामान्य माणसांना धर्माच्या कपाटात बंद करून आपल्याला हवं ते करण्याचा जो घाट घातला आहे हे संविधान दृष्ट्या निश्चितच स्वागतार्ह नाही. राजा श्री रामचंद्र आणि रामायण ग्रंथातील त्यांचा इतिहास पाहिला असता राजा श्री रामचंद्र यांच्याकडून आजच्या समाज, राजकारण, संस्कृती आणि अर्थकारणाने अनंत गोष्टी आपल्यामध्ये साठवण्याची आज नितांत गरज असल्याची जाण होते.

जो दिव्य कर्म करतो तो देव. जो देतो तो देव. जो आपली चूक जाहीरपणे मान्य करतो आणि समाजाला स्वतःच्या वर्तनातून दिशादर्शन करतो तो देव. जे जे महापुरुष असं वर्तन करून गेले त्या सर्वांचे कार्य दिव्यच आहे. त्यात राजा श्रीरामचंद्र यांचा इतिहास मोठा गमतीशीर आहे. आपल्या सावत्र आईच्या इच्छेखातर आपलं राज्य देणारा आदर्श मोठा भाऊ म्हणजे श्रीराम! आपल्या पत्नीला वनवासात सुद्धा सोबत घेऊन जाणारा आदर्श पती म्हणजे श्रीराम! आपल्या भावाला स्वतःच्या जीवापेक्षाही पलीकडे जपणारा आदर्श भाऊ म्हणजे श्रीराम! राजा श्रीरामही एक माणूसच होता हे विसरून चालणार नाही. त्यांच्या हातूनही चुका झाल्या हे सर्वांना मान्य करावेच लागेल. आपली गरोदर पत्नी सिता संशयावरून वनात सोडणे, बिचाऱ्या शंभूकाचा वध इत्यादी गोष्टी माणूस म्हणून श्री रामाकडून चुकल्याच आहेत. असं असलं तरी राजा श्रीरामचंद्र त्यांच्यातील अनंत गुणांनी समृद्ध असलेले आपल्याला आजही तेवढेच पथदर्शी आहेत. वर्तमान काळात श्री रामचंद्र आणि त्यांचा तत्सम इतिहास सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अनुषंगाने वापरणे काळाची अपारीहार्यता असताना श्री रामचंद्र, श्रीराम नवमी आणि त्यांचा संपूर्ण इतिहास हा केवळ धर्म आणि राजकारणासाठी वापरून समता, ममता, प्रेम, बंधुता, जिव्हाळा, आपुलकी इत्यादी महत्त्वपूर्ण गुणांनी ओतप्रोत असलेला महान राजा श्री रामचंद्र यांच्या संपूर्ण इतिहासाची प्रतारणा करणे नव्हे काय? आज समाजाची होत असलेली अधोगती पाहून प्रचंड व्यथा वेदना होतात. धर्माच्या नावाखाली सुरू असलेला प्रचंड बाजार, बोकाळलेली धर्मांधता आणि शबरीची, एका भिल्लीनीची उष्टि बोरं खाणारा श्री रामचंद्र आणि आज विस्कटत चालली सामाजिक घडी याचा कुठेतरी खोलवर विचार होणे गरजेचे आहे.

आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहणारा राजा श्रीरामचंद्र, आपल्या भावाला स्वतःपेक्षाही जास्त जीव लावणारा भाऊ श्रीराम आपल्या सखी आणि सावत्र आईंना समानतेने सन्मान देणारा सुपुत्र राजा श्रीराम! आपल्या गुरूंची आणि प्रजेची स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त जपणूक करणारा प्रजापती राजा श्रीराम! तद्वतच सत्य, न्याय, समता, बंधुता इत्यादी महत्त्वपूर्ण बाबी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करणारा राजा श्रीरामचंद्र सर्वच राजांबरोबर आजही आपल्यासाठी एक आदर्श राजा म्हणून पथदर्शी आहे! असे असताना आज बोकाळलेला जातीयवाद, धर्मांधता इत्यादी परिपेक्षातून राजा श्रीरामचंद्र यांच्या चरित्र आणि चारित्र्याचा अभ्यास होऊन त्यांच्यातील एक एक गुण काही प्रमाणात जरी आज समाजात रुजला तर खऱ्या अर्थाने आपल्याला राजा श्रीरामचंद्र यांच्या जयंतीनिमित्त सन्मान वाटेल.

केवळ स्टेटस ठेवून किंवा मीडियावर शुभेच्छा देऊन राम नवमी साजरी होणे म्हणजे दिखावा आहे! कुठेही प्रदर्शन न करता, स्वतःतील राजा श्री रामचंद्र यांच्यातील एखादा छोटासा सदगुण जरी जागा झाला आणि त्या अनुषंगाने आपण जर पाऊल उचलले तरच खऱ्या अर्थाने श्रीराम नवमी साजरी होणे होय! केवळ झेंडे, पोस्टर्स कर्णकर्कश आवाज करून श्रीराम नवमी साजरी करण्यापेक्षा राजा श्रीरामचंद्र यांच्यातील महत्त्वपूर्ण मानवतावादी गुणांचा समावेश आपल्या जीवनात करूया आणि सर्वांनाच आजच्या या श्रीराम नवमीच्या शुभेच्छा देऊया! धन्यवाद!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये

कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ

जि.परभणी (महाराष्ट्र)

मो.9158064068

Comments

Popular posts from this blog

फुल!

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!