गीता-ज्ञानेश्वरी का वाचावी?
गीता-ज्ञानेश्वरी का वाचावी? " गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे ? का वाचली पाहिजे गीता ज्ञानेश्वरी? असे एक ना अनेक प्रश्न सखीने विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले. " विचार करून सावकाश उत्तर दिलेस तरी चालेल." सखीने उदार मनाने मला सवलत दिली. मी म्हणाले , " गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचे नाते असावे. निश्चित फरक मला सांगता येणार नाही पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने , तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने , अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. " सखी: "उदाहरण दे." हिचं डोकं आहे की प्रश्नपत्रिका हा प्रश्न गिळून , मनात ठेवून मी म्हटले ," भुंगा आणि कमळ म्हटले की काय आठवते ?" सखी: "कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो." ...