उसवण: गरिबी, सत्वशील जीवनाचा विदारक दाह!

समीक्षण

युवा साहित्य अकादमी २०२४ पुरस्काराने सन्मानित कादंबरी...

उसवण
---श्री देविदास सौदागर

प्रकाशक: 
देशमुख अँड कंपनी लि.पुणे

उसवण: गरिबी, सत्वशील जीवनाचा विदारक दाह!
   
            अक्षरे माणसाला अस्वस्थ करतात. प्रत्येकामध्ये विचार लाव्हा खदखदत असतो. त्यात एकीकडे काही माणसं स्वतःशी संवाद करतात, तासंतास मोबाईलच्या निर्जीव, गुळगुळीत काचेसोबत व्यर्थ खेळत असतात. दुसरीकडे चिंतनशील माणसं सरळ लेखणी उचलतात आणि आपल्या मनातलं लिहायला बसतात. लेखन हे सहजासहजी होत नाही. खळबळ, मध्ये भरपूर साठलेलं, इतरांना सांगायचं राहिलेलं असतं आणि त्यातूनच ते भडभडून बाहेर येतं. आज मोबाईल-मीडियामुळे नवनवीन लिहिणारे लोक माहित होऊ लागले, नवलेखकांचे समूह तयार झाले. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत निघाली. मी मी म्हणणाऱ्यांना मिडीयावर यावे लागले. लेखन क्षेत्रातील ही नव क्रांतीच म्हणावी लागेल! यातून दिवसेंदिवस दर्जेदार वाङ्मय निर्माण होत आहे, ते प्रकाशात येत आहे. नव्या लेखकांची ओळख होत आहे. नवनवे लोक वाचत, लिहीत आहेत. त्यातूनच कालपरवा तुळजापूर येथील टेलर, कविवर्य श्री देविदास सौदागर यांची उसवण कादंबरी युवा साहित्य अकादमी २०२४ पुरस्काराने सन्मानित झाली. हे कळल्याबरोबर हरिती बुक गॅलरी, लातूर यांच्याकडून तात्काळ मागवली आणि एका बैठकीत वाचली पण.   
            उसवण, ११६ पाने असलेली देशमुख आणि कंपनी प्रा.लिमिटेड, पुणे प्रकाशित कादंबरी. या कादंबरीला कौस्तुभ घाणेकरांचे बोलके मुखपृष्ठ लाभले आहे. जुनी शिलाई मशीन, वर मोजपट्टी आणि भोवती रक्ताचे लाल- काळपट मोठाले शिंतोडे बरंच काही सांगून जातात. सुज्ञ निरीक्षकास मुखपृष्ठच कादंबरी वाचण्याची उत्कंठा निर्माण करते. मनोगताचा पाल्हाळ न लावता लेखकाने, "माणसाची मुलभूत गरज म्हणून कपड्यांची ओळख आहे. हा कपडा एका शिंप्याच्या आयुष्याला कसा व्यापून राहतो, त्याची गरिबी, त्याचा संघर्ष, त्याची तगमग...या गोष्टी इथं जोडून घेण्याचा प्रयत्न केला आहे" अशी हृद्य साद घालत वाचकांना कादंबरी खुली करून दिली आहे. मलपृष्ठावर सुप्रसिद्ध साहित्यिक सुधीर रसाळ सरांची संक्षिप्त पाठराखण आहे.
            विख्यात कवी गदिमांच्या "एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे" या भावगीताने कादंबरीचे कथानक सुरु होते. तृतीय पुरुषी एकवचनी निवेदनात कादंबरी मार्गक्रमण करते. इथे निवेदक सर्वज्ञ असतो. एकूण तेरा भागात लिहिलेली ही कादंबरी वाचकांस शेवटपर्यंत घट्ट पकडून ठेवते. ग्रामीण भागातील विठू टेलर, त्याची सुस्वभावी पत्नी गंगा आणि नंदा-सुभाष ही दोन मुलं, यांच्या जीवघेण्या संघर्ष, सत्वशील, खडतर प्रवासाची ही हृदयद्रावक चित्तरकथा! कादंबरीची सुरुवात अत्यंत साधी, सरळ परंतु प्रभावी करतांना निवेदक कादंबरीचा नायक विठू टेलरच्या जीवनातील एकेक धागा अलगद उलगडत जातो. कपडे शिवतांना विठूच्या, "कपाळावरचा टिळा त्याच्या घामात मिसळला" हे वाचतांना विठू वारकरी आहे हे लक्षात येते. दुसरीकडे "विठूच्या जाड्याभरड्या कापडी आयुष्यात 'गंगा'नावाचा रेशीमधागा होता. ही रेशीमगाठ त्याचं जगणं बळकट करत होती." "सदा अफाट जीव लावणारी, वाईट परिस्थितीत खंबीर उभी राहणारी गंगा त्याचा जणू जीवच होती." पती-पत्नी एकमेकांना जीव लावत आपला संसाराचा गाडा हाकत आहेत. कादंबरीतील दोन्ही मुख्य पात्रे लवकरच वाचकास भेटतात. रात्रंदिवस कपडे शिवणारा विठू टेलर एका एका टाक्याने संसारातील सुख-दुःखाची दोन्ही टोके जोडण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. चौकात विठूचं दुकान आहे. तिथंच रघुचे चहाचे दुकान आणि गणूची पानटपरी आहे. हे सर्व एकमेकांचे चांगले मित्र आहेत. लगीनसराई म्हणजे टेलरची खरी सुगी. मात्र आता पहिल्यासारखे लोक कपडे शिवायला टाकत नाहीत. जागोजागी रेडीमेडची दुकानं थाटलीत. टेलरचा धंदा बसलाय. तिकडं आठवीत असणारी विठूची मुलगी नंदा, अजिंठा-वेरूळला सहलीला जाण्याचा हट्ट धरते; मात्र विठूकडे तिला द्यायला पैसे नाहीत. मुलगी नाराज झालेली पाहून विठूचे डोळे गळायला लागतात. दिवसेंदिवस परिस्थिती आणखीनच खडतर होत जाते. लगीनसराई, दसरा, दिवाळी हाच खरा टेलरचा कमाईचा काळ, पण दुकानावर गिऱ्हाईक नाही. एकेकाळी विठू अन् त्याच्या वडिलांनी मशीन कामावर चार एकर शेत, म्हैस-बैल केले होते. दोन बहिणींचे लग्न झाले, त्यात कर्ज झालं आणि सर्व बुडालं.
            आजचे खडतर दिवस विठूला, "कापड कापल्यावाणी करकर कापावं वाटतेत." कसं तरी ओढाताणीत विठू-गंगाचा संसार चालू आहे. त्यात घोळ घाल्या भीमा पवार सारखी गोरगरिबांचे पैसे बुडवणारी श्रीमंत, दांड माणसं विठूला सतत नडत असतात. बळी तो कान पिळी! असे असतांना दुष्काळात तेरावा, विठूच्या पत्नीला सांधेदुखीने ग्रासले आहे. पावसाळा सुरु होतो. हाताला काम नाही. घरातलं अन्नधान्य संपलंय. "आभाळ भरून आलं की, वातावरण थंड होतं. बाजार थंड. अशा थंड गोष्टींमध्ये एकच गरम गोष्ट होती, ती म्हणजे पोटाची आग...!" गरिबी लई वाईट आणि त्यात माणसाचं पोट त्याहून वाईट! पोट नको ती कामे करायला लावते! बिचारी गंगा लेकरांच्या पोटासाठी मंगळवार-शुक्रवार अंबाबाईचा जोगवा आणि रविवारी खंडोबाची वारी मागते. त्यात बायका तिला हिणवतात. त्यामुळे "आताच्या आता जमीन फाकली तर किती बरं होईल!आपण तिच्या पोटात उडी घेऊ" म्हणत बिचारी गंगा थंडगार होऊन बसते. पाणी आणतांना नंदा सायकल अंगावर घेऊन पडते. खांद्यातून हात दुखावतो. विठू मोडकी सायकल घेऊन रातोरात बाजूच्या गावातून आंबेहळद आणि रगतबोळ आणतो. त्यात त्याचे पाय रक्तबंबाळ होतात. विठू-गंगाच्या संसारात असे अनेक जिवंत, हृदयद्रावक प्रसंग चित्रण करत कथानक अनुलोम पद्धतीने पुढे सरकत राहते. सर्वात महत्वाचं म्हणजे विठू-गंगाचा प्रेमविवाह आहे. गंगा विठूच्या मामाची मुलगी, ते दोघेही एकमेकांना आवडतात आणि त्यांचं लग्न होतं!
            कादंबरी लेखनाच्या सर्वच अयमांनी ओतप्रोत भरलेली आहे. विठू-गंगाची दोन्ही मुले लिहितात ही कादंबरीतील सर्वात मोलाची बाब! नंदाचे 'सुई बोलू लागली तर' आणि बक्षीसपात्र 'वडिलांना पत्र' जिथे
लेक
बापाचा नाजूक धागा
या धाग्याची चिंता
अन्
या धाग्याचा गुंता
बापाला आयुष्यभर सुटत नाही.
हे प्रगल्भ शब्द विठू-गंगा या दोघांना सुखावतात तर वाचकांस सखोल करून जातात. झेंडे, त्यांचे रंग, त्यावरून वाद, पंढरपूरला नामदेव पायरीवरून विठ्ठलासी संवाद, हुशार असलेल्या वेड्याला साळुंके सर आणि विठूने मोफत शिवलेले कपडे, वेड्याचा झालेला खुण, गावातील निरपेक्ष कीर्तनकार महादेव महाराज, जागोजागी आढळणारे अभंग, कबीराचे दोहे, कवितेच्या ओळींनी सर्वत्र प्रगल्भ बाबींचे चित्रण करत कादंबरी झपाट्याने पुढे सरकते. कादंबरीतील अनेक प्रसंग वाचकांस अंतर्मुख करतात. विठू-गंगाचा आणि नंदा-सुभाषचा संघर्ष वाचता वाचता कधी कादंबरी संपते तेही कळत नाही.          
वर्तमानातील महत्वपूर्ण बाबींनी शिगोशिग भरलेली उसवण एक उच्च, दर्जेदार कलाकृती आहे. व्याकरण हा भाषेचा दागिना. शुद्धलेखन, अवतरण, कवितेच्या ओळी इत्यादी सर्वच लेखनाच्या तंत्रशुद्ध स्तरावर उसवण तंतोतंत उतरली आहे. कादंबरीतील वातावरण, इतर जिवंत पात्रे, विविध प्रसंगी आलेले सहज संवाद, बोलक्या प्रसंगातून वाचकावर मजबूत पकड इत्यादींनी कादंबरीची बांधणी उत्तम जमली आहे. साहित्य अकादमीने ही कादंबरी निवडली हे योग्यच झाले. यामुळे लिहित्या, तरुण हातांना बळ मिळाले. तेंव्हा मित्रहो, मी ही कादंबरी वाचली आहे आपणही नक्की वाचा आणि उसवत चाललेल्या जीवनाला उसवणचा एक टाका देऊन नवलेखणीला ताकद द्या!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, कीर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)   

श्री देविदास सौदागर
9175546593

हरिती बुक गॅलरी, लातूर
7385521336

Comments

Popular posts from this blog

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

फुल!

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!