म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे...!

 

म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे...

        विस्तीर्ण, विशालकाय पसरलेल्या पर्वतावरील एकाकी पडलेल्या पाषाणाला एक शिल्पकार आपल्या छन्नी-हातोडा आणि अलौकिक कल्पकतेच्या सहाय्याने मूर्तीचे रूप देऊन मंदिरात केवळ पूजा करण्यायोग्य बनवत नाही, तर त्या दगडामध्ये लाखो ज्ञानी-प्रज्ञावंत माणसांना त्यांच्या जागृत श्रद्धा आणि यशासाठी सजीव प्रतिक निर्माण करतो ! हाच खरा गुरु ! हेच गुरुचं खरं गुरुत्वाकर्षण ! गुरुचं गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षाही जास्त प्रवाही, जे जीवनातील कण-कण आणि क्षण-क्षण व्यापून टाकतं ! यामुळेच कि काय, कुणी कितीही महान-प्रतिभावंत-श्रीमंत-गुणवंत आणि कोणत्याही पदांवर विराजमान असला तरी क्षणार्धात गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो ! गुरु नेमकं आपल्या शिष्याला काय देतो बरं ? हा मोठा कळीचा प्रश्न आहे. याचं उत्तर म्हणजे, गुरु शिष्याला काहीच देत नसून केवळ शिष्यातील लघुतत्व संपवतो आणि त्यालाच गुरुस्थानी विराजमान करतो ! तोच खरा गुरु ! गुरु म्हणजे कुणी कानात फुंकणारा, बंदिस्त करून लोकांना गुह्य ज्ञान सांगणारा नसून 'गुह्य लोकांती प्रकट करणारा'च खरा गुरु होय ! गुरु म्हणजे परीसापेक्षाही श्रेष्ठ ! परीस केवळ लोखंडाचं सोनं करतो, परीस नाही करू शकत; परंतु गुरु आपल्या शिष्याला गुरुत्व प्रदान करून आपल्या बरोबरीचं स्थान देतो ! म्हणजेच गुरु सोनं नाही तर दुसरा परीसच तयार करून आपल्या शिष्यालाच गुरु करतो !

            गुरु म्हणजे सच्चा वाटाड्या ! गुरु आपल्या विद्यार्थ्यांना निरपेक्ष, स्वच्छ आणि प्रांजळ भावनेने मार्गदर्शन करून त्यांना योग्य मार्गावर चालण्याचा उपदेश करतो. माणसाला जन्मापासून ते आत्तापर्यंत अनेक गुरु भेटत आलेत. त्यातील प्रथम गुरु म्हणजेच आई-वडील, कुटुंब आणि भोवतालचे वातावरण ! खऱ्या अर्थाने माणसाची जडणघडण ही त्याच्या परिवारातच होत असते. तिथेच त्याला सुसंस्काराचे बाळकडू मिळते. कुटुंबातीलच व्यक्ती कसा श्रेष्ठ गुरु असू शकतो ? याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ ! संत ज्ञानेश्वर 'ज्ञानेश्वरी'चा प्रारंभ

देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ 2

या ओव्यांनी करतांना ओमकार, श्री वेद, स्वसंवाद, श्री गणेश आणि जेष्ठ बंधू श्री निवृत्तीनाथ यांना वंदन करूनच पुढे लेखन करतात. म्हणूनच आपले आई-बाबा-दादा-ताई आणि इतर नातेवाईक हेच आपल्याला बोट धरून उभं राहण्यापासून ते कुणाशी कसे बोलावे, कसे वागावे, काय खावे, काय खावू नये, इतकेच काय कोणता बूट कोणत्या पायात घालायचा इथपर्यंत शिकवत असतात. म्हणून महात्मा संत कबीरजी गुरूविषयी

गुरु कुम्हार शिष कुंभ है, गढि गढि काढैं खोट। अंतर हाथ सहार दै, बाहर बाहै  चोट

हा दोहा लिहून गुरु शिष्यावर कसे मूलगामी संस्कार करत असतो (?) याचे सुंदर उदाहरण देतात. गुरु म्हणजे कुंभार, जो मडके घडवतांना आतून आधार देऊन बाहेरून थापत असतो, त्याप्रमाणे गुरु आपल्या शिष्यांना घडवत असतात. म्हणूनच अनेकांनी गुरूलाच आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व देऊन त्यांनाच ईश्वर मानले आहे !

            जीवनातील गुरुचे स्थान आणि गुरुस्पर्शामुळे होणारे अमुलाग्र बदल सर्वांनाच सर्वकाळ सुखावून जातात ! गुरूंचा कृपाकटाक्ष किती महत्वाचा आहे (?) याचे अनेकविध दृष्टांत आणि त्यानुषंगाने सिद्धांत आपल्यासमोर येतांना दिसतात. वारकरी संप्रदायाचे मुकुटमणी श्री संत नामदेव महाराजांना गुरूच्या उपदेशाने जीवनात नवा सूर्योदय झाला, अहंकाराची काळीकुट्ट रात्र संपून नवविचार उगवले ! एवढेच नाही तर

आला शीतळ शांतीचा वारा । तेणें सुख झालें या शरिरा । फिटला पातकांचा थारा । कळीकाळासी धाक दरारा गा

एवढे अमुलाग्र बदल झाल्याची साक्ष ते स्वतःच देतात. माणसाच्या जीवनाला चिरशांती आणि सुखप्राप्ती बरोबरच कळीकाळावर देखील विजय मिळविण्याचे सामर्थ्य गुरुस्पर्शाने माणसामध्ये निर्माण होते. देवा पासून ते दानवापर्यंत प्रत्येकाला गुरूची नितांत गरज असून, त्याच्या आगमनाने प्रत्यक्ष

देव तयाचा अंकिला । स्वयें संचरा त्याचे घरा॥

असा दाखला संत एकनाथ महाराज आपल्या अभंगातून देतात. याच अनुषंगाने संत तुकोबांना सुद्धा गुरूचा स्वप्नात उपदेश झाला आणि त्यानंतर त्यांचे जीवन मूलतः बदलून गेले.

बाबाजी आपुले सांगितले नाम  मंत्र दिला राम कृष्ण हरी 

असे एक ना अनंत अभंग-वचने गुरु आणि त्याच्या मार्गदर्शनाबद्दल आढळून येतात. यापुढे जाऊन संत ज्ञानेश्वर आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना लिहितात,

गुरु हा सुखाचा सागरू | गुरु हा प्रेमाचा आगरु | गुरु हा धैर्याचा डोंगरु | कदाकाळी डळमळीना ||

ही अद्भुत शक्ती केवळ केवळ गुरूच्या स्पर्शाने आणि अस्तित्वाने प्राप्त होते याचं अनुभूतीपूर्ण चित्रण माउली या अभंगातून करतांना दिसतात. म्हणूनच कोणताही कार्यक्रम असो, सर्वप्रथम

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।

हा श्लोक म्हटला जातो आणि कार्याला आरंभ केला जातो. गुरु एवढा श्रेष्ठ आणि त्याचे स्थान का महत्वाचे आहे ? कारण

विद्वत्त्वं दक्षता शीलं सङ्कान्तिरनुशीलनम् । शिक्षकस्य गुणाः सप्त सचेतस्त्वं प्रसन्नता ॥

गुरु विद्वत्ता, दक्षता, शिल, सद्गुण, प्रसन्नता इत्यादी गुणांनी ओतप्रोत भरलेला असल्या कारणाने गुरुच माणसाचे संपूर्ण जीवन परिवर्तीत करू शकतो. त्यामुळेच ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर सोपा दृष्टांत देतात,

म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे। तेणे कृतकार्या होईजे।। जैसे मूळ सिंचने सहिजे। शाखा पल्लव संतोषिती।।

झाडाला बहर येवून ते झाड फळा-फुलांनी जर भरगच्च सजून जायचे असेल तर त्याच्या मुळाशी पाणी घालावे लागते, त्याच न्यायाने जाणत्या लोकांनी गुरूंना वंदन करून स्वतःच्या जीवनाचे उद्यान फुलवून टाकावे ! झाडाला बहर येवून ते झाड फळा-फुलांनी जर भरगच्च सजून जायचे असेल तर त्याच्या मुळाशी पाणी घालावे लागते, त्याच न्यायाने जाणत्या लोकांनी गुरूंना वंदन करून स्वतःच्या जीवनाचे उद्यान फुलवून टाकावे !

            आज काळ बदलला असून आपण तंत्रज्ञानाच्या युगात असलो तरी गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही ! आभासी पद्धतीने गुगल मिट, झूम आणि अन्य साधनांच्या आधारे शिकविण्याचा कितीही प्रयत्न करत असलो तरी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून ज्ञान गृहन केल्याशिवाय ते गळी उतरत नाही. विद्यार्थ्यांना शिस्त, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य याचा अनुभव घ्यायचा असेल तर गुरुच्या मार्गदर्शनाला काहींही पर्याय नाही. हे आत्ताच संपूर्ण जगाने चांगले अनुभवले आहे. त्यामुळेच तर तमाम पालक वर्ग शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी करत होता. तेंव्हा जीवनात कितीठी बदल होऊ द्या, गुरुला पर्याय नाहीच ! त्याचबरोबर अन्य बाबी सुद्धा आपल्या गुरुस्थानी आहेत. जसे कि; गुगल, विकिपिडीया, आणि अन्य साधने सुद्धा गुरूची महत्वपूर्ण भूमिका निभावतांना दिसतात. तेंव्हा, चला आपल्या आई-वडिलापासून ते बाबा गुगल पर्यंतच्या सर्वच गुरुप्रती आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करूया आणि सर्वच गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊया ! जय गुरुदेव !

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये

कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ जि.परभणी (महाराष्ट्र)

मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, लेखक, प्रबोधनकार, प्राणायाम प्रशिक्षक आहेत)

Comments

Popular posts from this blog

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

फुल!

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!