फोटोची वाट पहात बसलेली कविता...!
फोटोची वाट पहात बसलेली कविता...!
मागील
आठवड्यात जेष्ठ कादंबरीकार, कथाकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक आदरणीय
गुरुवर्य श्री बाबाराव मुसळे सरांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विदर्भ साहित्य मंडळाने
वाशीम येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला. या सुंदर कार्यक्रमाला महाराष्ट्रातील
सुप्रसिद्ध कवी गुरुवर्य प्रा.इंद्रजित भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे सर्वच फोटो आदरणीय भालेराव गुरुजींनी मला पाठवून दिले आणि सर्व
भाषणांचे व्हिडिओ आदरणीय मुसळे सरांनी त्यांच्या युटूब लिंकसह मला पाठवून दिले.
फोटो आणि सर्व भाषणांच्या व्हिडिओत सृजनांचा गोड स्नेहमेळा जमलेला पाहून मन
हर्षोल्हासाने बागडायला लागले. एकीकडे स्वतःच्या कोषात बंदिस्त असणारी माणसे
आपल्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्याच्या पायऱ्या झिजवत असतांना इथे सृजनशील मनाची
माणसं एकमेकांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी शेकडो किलोमीटरचे अंतर कापून एकमेकांच्या
लेखणीचे तोंडभरून कौतुक करतांना पंचाहत्तरीतील बाबाराव मुसळे आणि पसष्टीतील
इंद्रजित भालेराव कसे खळाळ, स्वच्छ नदीसारखे वाहताहेत! हे अलौकिक दृश्य पाहून लेखक
काय असतो आणि कसा असावा? याचे उत्तमोत्तम उदाहरण म्हणजे हे दोन्ही गुरुवर्य होत!
या लेखन प्रपंचाचे
कारण म्हणजे मागील वर्षी ऑगस्ट २०२२ महिन्यात गुरुवर्य इंद्रजित भालेराव सरांचा
'भूमिनिष्ठांची मांदियाळी' कविता संग्रह प्रकाशित झाला. पूज्यनीय, निस्पृह
वृत्तीने महान कार्य करणाऱ्या मंडळींना सरांनी काव्यबद्ध केलेला हा काव्य संग्रह
मागील कविता संग्रहांसारखाच लोकप्रिय ठरला. त्यावर अनेकांनी आपले समीक्षण लिहिले.
त्यातच जेष्ठ कादंबरीकार, कथाकार श्री बाबाराव मुसळे सरांनी सुद्धा या ग्रंथावर
समीक्षण लिहून मिडीयावर प्रसिद्ध केले. हे समीक्षण भालेराव सरांनी वाचल्याबरोबर
आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतांना मुसळे सरांचे ओतप्रोत कौतुक केले. मुसळे
सरांचे वय आणि त्यांचे सुरु असलेले लेखन कार्य निश्चितच आपल्या सर्वांना पथदर्शी
आहे याचा उल्लेख केला. तसं पाहिलं तर हे दोन्ही लेखक माझे आवडते लेखक आणि व्यक्ती
सुद्धा! एकाची कथा-कादंबरी तर दुसर्याची भाव कविता नेहमीच मनाचा ठाव घेत असते. अशा
दोन महान लेखकांनी एकमेकांविषयी एवढं प्रांजळ, सुंदर, उत्कृष्ट लिहिलेलं वाचलं की;
आत्मप्रौढीत अडकलेल्या छोट्या-छोट्या कवी-लेखकांची कीव यायला लागते. या दोन्ही
महानुभाव गुरुवर्यांचे लेखन वाचून हे दोन्ही सृजन एकमेकांच्या भेटीला आले असून
त्यांच्यामध्ये कसा साहित्यिक संवाद होईल? याची कल्पना केली आणि मला पटकन विंदा
करंदीकरांची 'तुकोबाच्या भेटी शेक्सपिअर आला' ही रचना आठवली आणि त्या रचने प्रमाणेच
मी ही एक कविता लिहून टाकली.
कविता तयार
होती परंतु दोन्ही सृजनांचा एकत्र फोटो मिळवणे म्हणजे मोठी कसरत! सुदैवाने या दोन
महानुभावांना मागील आठवड्यात एकत्र ऐकणे आणि या दोघांचा एकत्र फोटो मिळाला आणि
माझ्या कवितेची प्रतीक्षा संपली! गुरुवर्य श्री बाबाराव मुसळे सर आणि गुरुवर्य
प्रा.इंद्रजित भालेराव सरांच्या फोटोसह ही कविता इथे देत असून नक्कीच ही रचना
आपल्याला आवडल्याशिवाय राहणार नाही! पुन्हा एकदा दोन्ही गुरुजींच्या चरणी नतमस्तक
होऊन दोघांनाही उदंड आयुरारोग्य चिंतीतांना दोघांच्या हातून उत्तरोत्तर मायमराठीची
लेखन सेवा अखंड घडून येवो!
इंद्रजिता भेटी बाबाराव
आले।
इंद्रजिता भेटी बाबाराव आले। हृदय निमाले उभ्या उभी॥
एक घाली दंडवत दुसरा जय हरी। झाली सुरू वारी शब्द पंढरीची॥
इंद्रजित म्हणे दुधु देई तुव्हा हाल्या । गाई घरा आल्या बा माझ्या तव्हा॥
बाबाराव म्हणे तू शब्दांचा जादूगार। उजळले शेत शिवार शब्दांनी त्या॥
भाग्यवान आम्ही नित्य
वाचतो तुम्हा। आशीर्वाद आम्हा शब्द द्यावा॥
एक होई चक्रधर दुसरा तुकी तुकला। शब्द साज सजला निळ्या गगनात॥
एक मराठवाडी माती दुसरा विदर्भाची खाण। एक नामदेव दुसरा तुकड्या संगे॥
असे भेटले दोघे अशी झाली गळाभेट। शब्द पोहोचले थेट काळजाला॥
विटेवरचा देव आला उतरून खाली। उरी घेऊन दोघांना ज्योत ज्योतीत निमाली॥
अशी अलौकिक भेट विठ्ठल हृदय चिंबचिंब। नाचू लागे बाप पांडुरंग वाळवंटी॥
प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये
कै.रमेश
वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि.
परभणी (महाराष्ट्र)
मो.
9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक,
योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

Comments
Post a Comment