डॉ.भास्कर बडे: शेतीमातीच्या व्यथा मांडणारा बहुआयामी सृजन!

 

डॉ.भास्कर बडे: शेतीमातीच्या व्यथा मांडणारा बहुआयामी सृजन!

            साहित्य समाजाचा आरसा असते. कथा, कविता, कादंबरी, नाटक आदि वाङ्मय हे त्या त्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींवर भाष्य करतांना नित्य जागृती करत असते. याच अनुषंगाने नव्या पिढीतील, एकविसाव्या शतकांतील बहुआयामी कवी, लेखक, कथा-कादंबरीकार, नाटककार, वावर प्रकाशन लातूरचे मालक, एका वाचनालयाचे सर्वेसर्वा, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.भास्कर बडे हे आपले लेखनाचे काम मोठ्या नेटाने करत आहेत. निवृत्तीनंतर एखादा माणूस आपल्या वयाला कवटाळून घरीच हरी हरी करत बसला असता, परंतु मुळातच बंडखोर वृत्तीचे असलेले कविवर्य डॉ.बडे सरांनी प्रत्यक्ष शेती करून त्यावर आधारित जिवंत अनुभव कथन करायचे ठरवले आहे. याचा परिपाक म्हणजे बडे सरांची लेखणी ही बीड जिल्ह्यासारख्या खडकाळ परिसरात शेतीमातीची कविता लिहून कविवर्य ना.धो.महानोरांचा वसा-वारसा मोठ्या ताकदीने चालवत आहेत. आज डॉ.बडे सरांचा ६३ वा वाढदिवस असतांना सर आपल्या लोणी गावाच्या वावरात ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात मुक्क्कामी आहेत. सगळीकडे खडकाळ माळरान असतांना आपल्या शेतावर बडे सर सफरचंदाची लागवड करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श उभा करत आहेत.

            अलीकडच्या तीन दशकाच्या कालखंडात मराठी साहित्य विश्वात डॉ.भास्कर बडे हे मोठ्या सन्मानाने घेतलं जाणार नाव! एक व्यासंगी कवी, नामवंत कथा लेखकांपैकी बडे हे एक नाव आहे. डॉ,बडे हे केवळ कथा लेखक नसून आपल्या खुमासदार शैलीतून ते श्रोत्यांना आपल्या कथा कथनातून मंत्रमुग्ध करणारे व्यासंगी व्याख्याता आहेत. डॉ.यांची कथा-कविता त्यांच्या शेतीमातीच्या जिवंत अनुभवातून प्रवास करतांना वाचकांना अंतर्मुख करते. जवळपास दिड डझनपेक्षा जास्त पुस्तके डॉ.बडे सरांच्या नावावर असून आत्तापर्यंत त्यांना वाङ्मयातील अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. लेखक या नात्याने डॉ.बडे हे एकाच साहित्य प्रकारात बंदिस्त नसून त्यांनी कथा-कविता लेखनाबरोबरच, कादंबरी, चरित्र ग्रंथ, मुलाखत ग्रंथ, बालसाहित्य इत्यादी साहित्य प्रकार हाताळले असून समीक्षण आणि संपादन क्षेत्रातसुद्धा त्यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या १९८८ साली प्रकाशित झालेल्या 'वावर' कविता संग्रहाने साहित्य क्षेत्रात खळबळ माजवली होती. शेतकरी व्यथे बरोबरच डॉ.बडेंची कविता

बाई गं धीट हो

घरासाठी उंबरठ्याबाहेर पाय टाक

चालता चालता बळ येईल पायात

उगाच करंगळी धरायचे

दिवस आता संपलेत

बाई गं धीट हो

इथल्या स्त्रीला धीट व्हायला शिकवते. या आणि अशा अनेक कवितांनी डॉ.बडेंनी समकालीन समाजमनाचा तळ ढवळून काढलेला आढळून येतो. येणाऱ्या पिढीला आधार देतांना डॉ.बडे सातत्याने आपले काव्य लोकाभिमुख करत असतात. कवितेच्या प्रांगणात त्यांची कविता फुलून येतांना त्यांची ग्रामीण कथा सुद्धा खेड्यापाड्यात रमतांना दिसते. त्यांचे 'पांढर' 'चिकाळा' 'खिलाऱ्या' 'आपल्या बापाच्या मातीत' आणि 'बाईचा दगड' हे कथासंग्रह आणि 'अंजीमाय' ही बाल कादंबरी मराठी कथा-कादंबरी विश्वात आपली वेगळी ओळख करून आजही वाचकांच्या पसंतीस उतरतांना दिसते.

            शिरूर कासार सारख्या माळरानाच्या पट्ट्यात लोणी वारणी येथे जन्मलेल्या डॉ.बडेंना आपल्या घरातील, आणि भोवतालच्या ऊसतोड कामगारांच्या व्यथा-वेदना खोलवर ज्ञात आहेत. यातूनच त्यांच्या 'पाणकणस' या कादंबरीने जन्म घेतला. उपेक्षित, वंचित उसतोड कामगारांच्या व्यथा मांडतांना डॉ.बडेंनी आपल्या परिसराचे प्रतिनिधित्व करतांना आपल्या लेखणीतून आपल्या माय-मातीशी इमान राखले आहे. याचबरोबर बीड जिल्ह्यात जन्मलेले राष्ट्रसंत श्री संत भगवानबाबा यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या डॉ.बडेंनी संत भगवानबाबा यांचे पुरोगामी, शैक्षणिक कार्य विषद करणारे चरित्र लिहून आपल्या परिसराचा वसा समृद्ध केलेला आढळून येतो. त्यांच्या 'वावर' मध्ये संत भगवानबाबा यांच्यावर

या डोंगरवनात बाबा तुम्ही होता

कष्ट, शांती जिद्द आणि शिक्षण

ही तर तुमची मुलतत्वे

म्हणूनच,------

विनोबांसारखे तुमच्या भेटी आले

या कवितेने बाबांच्या सर्वांगीण कार्याची महती त्यांच्या काव्य लेखनातून सुद्धा दृगोचर झाल्याशिवाय रहात नाही. 

            जन्मताच चिवट, कणखर आणि लढाऊ बाण्याचे असलेले डॉ.भास्कर बडे हे केंव्हाही परिस्थितीशी दोन हात करण्यास सज्ज असतात. यातूनच त्यांनी आपली वेगळी ओळख अबाधित ठेवतांना ते साहित्य विश्वातील निवडणुकीच्या माध्यमातून मराठवाडा साहित्य परिषदेवर दोनवेळा निवडून येवून कुणाचाही राजकीय वरदहस्त नसतांना ते मा.सा.प.च्या कोषाध्यक्ष पदापर्यंत जाऊन विराजमान होतांना त्यांचा मराठवाड्यातील ग्रामीण साहित्यिकांना अभिमानच वाटत राहिला आहे. याशिवाय आत्तापर्यंत डॉ.बडेंनी अनेक कार्यक्रमातून कवितेचे आणि कथांचे सादरीकरण केले असून विविध संमेलनाची अध्यक्षस्थाने भूषविली आहेत. त्यांचा भारतभर लेखक-कवींच्या मित्रपरिवाराचा मळा फुललेला असून त्या द्वारे ते सातत्याने लोकांमध्ये बोलतांना, वावरतांना दिसतात. एवढे विपुल लेखन असलेले डॉ.बडे हे आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत. त्यांच्या 'पाणकणस' कादंबरीला कै.भि.ग.रोहमारे आणि एकता साहित्य पुरस्कार, खिलाऱ्या कथा संग्रहास राज्यस्तरीय 'साहित्य साधना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक कथा महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाच्या बी.ए. आणि एम.ए. च्या अभ्यासक्रमात आहेत ही मोठी गौरवपूर्ण बाब म्हणावी लागेल.

            आज रोजी डॉ.भास्कर बडे सर आपला त्रेसष्टावा वाढदिवस मोठ्या सन्मानाने साजरा करतांना लेखन विश्वाला त्यांच्याकडून याहीपेक्षा सरस आणि धारदार लेखणाची अपेक्षा आहे. वय आणि अनुभवातून आलेली प्रगल्भता आणि त्यातूनच निर्माण होणाऱ्या नवीन कलाकृती मराठी सास्वतांना आणखी समृद्ध करतील यात तिळमात्र शंका नाही. वावर प्रकाशनाच्या माध्यमातून डॉ.बडे सरांनी नवोदित लेखकांना प्रकाशनाचे नवे दालन खुले करून नवीन ग्रंथ प्रकाशित होणे ही काळाची गरज आहे. नव्याने आलेले शेतीमातीचे अनुभव, शेतमजुर, शेतमालाचे भाव, खर्च आणि उत्पन्न यातील येणारी तफावत, त्यातून शेतकऱ्याची होणारी ससेहोलपट आणि परिणामी वाढत्या शेतकरी आत्महत्या यावर डॉ.बडे सरांच्या भविष्यात कथा-कादंबरी-कविता येतील आणि पुन्हा एकदा इथल्या बेधुंद, मस्तवाल सत्ताधारी मंडळींचे डोळे उघडतील हीच साहित्यिक अपेक्षा त्यांच्याकडून आहे. शिवाय या नंतरचे डॉ.बडे सरांचे दैनंदिन जीवन आनंदाने ओतप्रोत राहून त्यांना उदंड आयुरारोग्य लाभो हीच निसर्ग-ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना करून हा लेखन प्रपंच तूर्तास इथेच थांबवतो! जय जवान! जय किसान!  

 प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये

कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ

जि. परभणी (महाराष्ट्र)

मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

Comments

  1. प्रा.डॉ. भास्कर बडे यांच्या साहित्य आणि जगण्याची आपण केलेली मिंमासा त्यांना केवळ सदिच्छा नसून ग्रामीण साहित्य, लेखन करताना आदर्श कसा असावा,याचे उत्तम उदाहरण आहे. आपले ऋण व्यक्त करतो.लेखकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🎂💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

फुल!

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!