डॉ.किशोर सानप: संत वाङ्मय अभ्यासक, साक्षेपी समीक्षक!


 

डॉ.किशोर सानप: संत वाङ्मय अभ्यासक, साक्षेपी समीक्षक!

            संत वाङ्मयाचे दृढमूल चिंतक, आपल्या साक्षेपी समीक्षेने नव लेखक-कवींची भक्कमपणे पाठराखण करणारे, समाजातील विविध मूलगामी विषयावर कादंबरी, ललित लेखनातून भोवतालाचे डोळे उघडवणारे मराठी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, सुप्रसिद्ध लेखक डॉ.किशोर सानप यांचे निधन झाले! आधुनिक मराठी वाङ्मय अवकाशातील एक ओजस्वी तारा निखळला! चिरेबंदी मंदिराच्या दोन शिळांच्या खिंडीतून दुर्दम्य इच्छाशक्तीने एखादा औदुंबर रुजावा आणि आपल्या थंडगार छायेने मंदिराचा संपूर्ण गाभारा शीतल व्हावा! मुळाशी ना कुठली माती ना पाणी, तरीही औदुंबर आपले काम करत राहतो! अगदी याच संघर्षशील न्यायाने डॉ.किशोर सानप सरांचे जीवनगाणे बहरत गेले. अकोला शहरात रहात असले तरी घरी परिस्थिती बेताचीच, त्यामुळे एक तरुण वयात स्थिरस्थावर होण्यासाठी धडपडत होता. वडिलांना नौकरी नसली तरी घरी वारकरी परंपरा रुजलेली होती. त्यात आजोबा (आईचे वडील) कीर्तनकार! अगोदरचे कीर्तनकार हे आजच्यासारखे नव्हते 'उथळ पाण्याला खळखळाट भारी!' आजोबांच्या अभ्यासपूर्ण, भक्तीने ओतप्रोत कीर्तनांनी श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे आणि युवा किशोर आजोबांची कीर्तने ऐकून प्रभावित व्हायचा, त्यावर चिंतन- मनन करायचा. श्री किशोर सानप यांच्यात तरुण वयात वारकरी विचारांचे बाळकडू रुजले आणि त्यानंतर सुरु झाला त्यांचा पुढील खडतर प्रवास!

            वाणिज्य पदवी-पदव्युत्तर-एम.फील.पर्यंतचे शिक्षण पूर्ण होऊनसुद्धा नौकरीचे कुठेच मिळाली नाही. विशेषतः वाणिज्य शिक्षण घेतांना त्या आभासी आकडेमोडीत त्यांना कधी रस वाटलाच नाही. ग्रंथालयात बसून तासनतास विविध ग्रंथांचे वाचन करतांना त्यांना मराठी कथा-कादंबरी वाचनाची ओढ लागली. मग त्यांनी बहि:शाल विद्यार्थी म्हणून मराठी विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. अगोदरच संशोधनाचा अनुभव असल्यामुळे त्यांना मराठी विषयात डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यावर १९९९२ साली नागपूर विद्यापीठातून आपले पीएच.डी.संशोधन पूर्ण केले. दुसरीकडे त्यांचे लेखन आणि नौकरीचा शोध सुरूच होता. आता डॉ.किशोर सानप विदर्भात लेखक म्हणून बऱ्यापैकी नावारूपास येत असतांना वर्धा येथील गो.से.वाणिज्य महाविद्यालयात अध्यापक म्हणून ते रुजू झाले. नौकरीमुळे आर्थिक स्थेर्य आले आणि सुरु झाला त्यांच्या आवडत्या लेखन प्रांतातील आनंददायी प्रवास!

            डॉ.भालचंद्र नेमाडे, शाम मनोहर सरांसारख्या सखोल, व्यासंगी, बहुभाषिक, बहुआयामी, रोखठोक लेखकांच्या वाङ्मयावरील समीक्षण, साक्षेपी संशोधनाने सानप सरांची वैचारिक बैठक मजबूत झाली. वाचन समृद्ध झालेले सानप लेखन प्रांतात उतरले. त्यातूनच त्यांचा 'ऋतू' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील कुपोषित बालकांच्या व्यथा मांडणारे 'कोवळी पानगळ' या महत्वपूर्ण वैचारिक ग्रंथाने डॉ.किशोर सानप मराठी वाङ्मयात ओळखले जाऊ लागले. त्यांचे मित्र श्री मनोज तावडे यांच्यासह 'तुकाराम: व्यक्तित्व आणि कविता' नावाचा त्यांचा वैचारिक ग्रंथ प्रकाशित झाला. आजोबांकडून आलेला कीर्तन-प्रवचनाचा वारसा अनायासे सानप सरांच्या लेखणीतून पाझरू लागला. तुकाराम स्पर्शाने प्रज्वलित झालेल्या विचार समृद्ध, संस्कार प्रगल्भ डॉ.सानप सरांनी त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलेच नाही. संत तुकाराम आणि नेमाडेंचा खोलवर प्रभाव त्यांच्यावर दृगोचर झाल्याशिवाय रहात नाही. त्यातूनच 'दशक्रियाची उत्तरक्रिया' वैचारिक लेख संग्रह, 'देशीवाद आणि मराठी साहित्य समीक्षा' सारखे मराठी वाङ्मय समीक्षेच्या प्रांतातील महत्वपूर्ण ग्रंथ त्यांच्याकडून लिहिले गेले. त्यानंतर त्यांच्या 'पांगुळवाडा' कादंबरीने बरीच खळबळ माजवली. एका नव्या विषयावरील आशयपूर्ण कादंबरीने डॉ.सानप पुरोगामी, सडेतोड लेखक म्हणून नावारूपास आले. 'प्रबोधन युगाची सांस्कृतिकता: आदि भारत ते आधुनिक भारत', 'भाषा, समाज, साहित्य, संस्कृती: सत्व आणि मुल्य', 'भालचंद्र नेमाडे यांची कविता, 'भालचंद नेमाडे यांची समीक्षा', 'मराठी कविता: नव्या दिशा', 'मराठी कविता: नव्या वाटा', 'मराठी कादंबरी: नैतिकता', 'मराठी कादंबरी: पाऊलखुणा', 'मराठी कादंबरीचे साहित्यशास्त्र' सारखे एकानंतर एक महत्वपूर्ण ग्रंथांचे लेखन डॉ.किशोर सानप सरांनी केले. यामुळे त्यांचा वैचारिक आणि लेखनिक आवाका नवलेखकांच्या नजरेतून सुटूच शकला नाही. हे सर्वच महत्वपूर्ण ग्रंथ आधुनिक मराठी भाषेच्या परिक्षेत्रातील महत्वपूर्ण समीक्षा ग्रंथ म्हणून नावारूपाला आले. कविता आणि कादंबरीच्या प्रांतात संशोधन करणाऱ्या संशोधकांना डॉ.सानप सरांचे हे सर्वच ग्रंथ पाथागामी झाले. डॉ.किशोर सानप सरांच्या समीक्षेची व्याप्ती सर्वत्र आढळून येत होती.

            दुसरीकडे सानप सरांना संत तुकाराम स्वस्थ बसू देत नव्हते. 'विद्रोही तुकाराम', 'तुका म्हणे', 'पुन्हा एकदा तुकाराम', 'तुकाराम दर्शन' सारखे संत तुकारामावर महत्वपूर्ण ग्रंथ डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.सदानंद मोरे, डॉ.दिलीप चित्रे, डॉ.आ.ह.साळुंके सारख्या विभूतीकडून लिहिले गेले होते. तुकोबांच्या विचारांची वाट या सर्वच महानुभावांनी सुकर केली असतांना सानप सरांना तुकारामासी तासनतास संवाद सुरु झाला. त्यातूनच 'महाकवी संत तुकाराम दर्शन: खंड १ ते ५' आणि 'युगपुरुष तुकाराम' या सहा महत्वपूर्ण ग्रंथांचे लेखन करून त्यांनी आपल्यावरील वारकरी संस्कारांचे ऋण फेडले. याशिवाय घरातील पंढरीची वारी सानप सरांना सातत्याने पंढरीला बोलवत होती. पंढरपूरच्या निळ्या दैवताची खोलवर रुजवणूक झाल्यामुळे 'भूवैकुंठ' ग्रंथाची निर्मिती झाली. यानंतर सानप सरांचे लेखन आणखीच बहरत गेले. एक लेखक घेऊन त्याचे संपूर्ण लेखन अभ्यासून त्यावर समीक्षा लिहिणे असा सपाटाच लावला. त्यातून 'रामदास फुटाने यांची कविता', 'रामदास फुटाने यांची भाष्य कविता', 'लघुपत्रिकेतील कविता', 'शाम मनोहर यांच्या कविता: शोध' 'समकालीन मराठी कविता आणि जागतिकीकरण', 'समकालीन समीक्षा: जाणीवा आणि भाष्य', 'समकालीन स्त्रियांच्या कादंबऱ्या', 'समांतर ग्रंथ निर्मिती: दाखल आणि भाष्य', 'साठोत्तरी मराठी कविता आणि देशियता', 'साठोत्तरी मराठी कादंबरी: मूल्य निर्मितीच्या दशा', 'सांस्कृतिक वर्तमान' इत्यादी जवळपास ४० पेक्षा जास्त समीक्षेच्या प्रांतातील अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथांचे अभ्यासपूर्ण समीक्षा लेखन डॉ.किशोर सानप यांच्याकडून झाले. शिवाय आजघडीला जवळपास १० ग्रंथ लेखन पूर्ण झाले असून लवकरच या सर्वच ग्रंथांचे प्रकाशन होणार होते.

            जेमतेम ६७ वर्षे जीवन लाभलेल्या डॉ.किशोर सानप सरांनी पन्नासपेक्षा जास्त महत्वपूर्ण ग्रंथांचे लेखन करून मराठी सारस्वतात आपली वेगळी ओळख निर्माण केली. यानंतरसुद्धा त्यांच्याकडून समीक्षेच्या प्रांतात आणखी महत्वपूर्ण ग्रंथ निर्मिती होणारच होती, परंतु काळ-वेळ कुणासाठी थांबत नाही. मागील काही वर्षांपासून डॉ.सानप शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. यातच काल २१ मे रोजी डॉ.किशोर सानप सरांनी आपल्या कन्येच्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. जुने-नवे यांचा सुरेख संगम घालून नवलेखकांना लिहिते करणारे हात अचानक शांत झाले. ऐंशीच्या दशकानंतर मराठी कवितेला अधुनिक परीपेक्षातून समीक्षा लेखन करणाऱ्या एकमेव साक्षेपी समीक्षकाने इहलोकीचा निरोप घेतला. त्याला जोडून महानुभाव, संत, वारकरी वाङ्मयाचे समकालीन जीवनाच्या अनुषंगाने विवेचन करून सानप सरांनी मराठी साहित्य विश्वाला ग्रंथ समृद्ध केले आहे. डॉ.किशोर सानप सरांच्या जाण्याने समीक्षा, संत, वारकरी, काव्य, कादंबरी लेखन प्रांतातील पोकळी न भरून येणारी आहे! त्यांचा साक्षेपी समीक्षा आणि संत वाङ्मय लेखणीचा वसा आणि वारसा आपण नव्या पिढीच्या सर्वच लेखक, समीक्षक अभ्यासकांनी पुढे घेऊन जायला हवा! असे होणे म्हणजेच डॉ.किशोर सानप सरांना खऱ्या अर्थाने शब्द सुमनांजली असेल! ओम शांती!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये

कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ

जि. परभणी (महाराष्ट्र)

मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

Comments

Popular posts from this blog

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

फुल!

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!