तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान: उत्तम संग्राह्य ग्रंथ

 


तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान: उत्तम संग्राह्य ग्रंथ

            अलीकडे मोबाईलचा सुळसुळाट आणि सर्वत्र भूलभुलैया मिडियामुळे वाचन आणि लेखन संस्कृती लोप पावत असतांना वाळवंटात मारुद्यान सापडावे त्याप्रमाणे बोटावर मोजता येतील एवढे लोक हल्ली मूलगामी चिंतन-मनन-वाचन-लेखन करून वाघिणीच्या दुधासी आपली इमानदारी जपताहेत! त्यापैकीच एक असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रंगकमी, पत्रकार, प्राचार्य, संशोधक, संपादक, फिल्म-माहितीपट निर्माते, व्यासंगी लेखक, फर्डे वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे मराठवाड्याच्या मातीत जन्मून कोल्हापूरच्या मातीत रुजलेले पुरोगामी विचारवंत, निवृत्त प्राचार्य डॉ.बाबा बोराडे यांनी नुकतेच 'तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान' हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. श्री मिलिंद काटे यांच्या अनुराधा प्रकाशन प्रकाशित या महत्वपूर्ण ग्रंथाचे जयसिंगपूर (कोल्हापूर) येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रकाशन होत आहे.

            अनुराधा प्रकाशन हे महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार जाऊन पुस्तके प्रकाशित करून आलेले अनुभवी प्रकाशन आहे. हे शिवधनुष्य पेलण्याचे काम एक व्यासंगी, चिंतनशील लेखक, ज्यांची जवळपास पन्नासच्यावर महत्वपूर्ण पुस्तके प्रसिद्ध आहेत असे मित्रवर्य श्री मिलिंद काटे एकटेच करत असतात. व्यासंगी लेखकास अनुभवी लेखक-प्रकाशक भेटले आणि सृजन-सुपीक जमिनीत विचार-शुद्ध बीज रुजले! मैत्री सुगंधाळली व महाराष्ट्रातील अनेक सृजनांचा मिळून एक समूह तयार झाला. त्यातून दिल-दोस्ती-दुनियादारी बहरत गेली. विविध विषय-आशयावर चर्चा होऊन 'वावर' आणि 'सृजन सोबती' समूहाला लागलेले सुमधुर फळ म्हणजे प्रा.डॉ.बाबा बोराडे लिखित 'तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान' हा ग्रंथ होय.

            काळ कोणताही असो, त्या काळात कोण काय लिहितो, बोलतो? कोणते ग्रंथ प्रकाशित होतात? कोणत्या लोकांचा सन्मान होतो? तरूण काय वाचतो, काय ऐकतो आणि काय करतो? याचे समकालीन समाजामध्ये इष्ट-अनिष्ट परिणाम काय जाणवतात? यावर देशाचे पुढील शंभर वर्षांचे भविष्य अवलंबून असते. तेंव्हा समकालीन लेखकांनी आपल्या काळातील घडामोडींवर लिहिलेच पाहिजे. लेखणी पैशाने किंवा सत्तेच्या वजनाने झुकली-वाकलेली नसावी! त्याचबरोबर आपला महान वसा-वारसा जे महापुरुष मागे ठेवून गेले आहेत त्यांच्या विचारांचे समकालीन परीपेक्षातून चिंतन-मंथन व्हायला हवे. विस्मृतीतील महापुरुष-तत्वे पुन्हा लोकाभिमुख होणे काळाची गरज आहे. त्याच अनुषंगाने डॉ.बोराडे सरांनी हा ग्रंथ लिहिला आहे. ग्लोबल वार्मिंगच्या काळात वैश्विक तापमानाबरोबरच माणसही गरम होताहेत. दया, प्रेम, शांती, जिव्हाळा, आपुलकी हे केवळ पुस्तकात वाचायला मिळत असतांना महापुरुषांच्या शांततापूर्ण विचारांचे सिंचन होऊन नव्या पिढीतील सर्वच सृजनांनी जैन धर्मातील शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर समजून घ्यावेत, त्यासाठी हा सगळा खटाटोप सुरु आहे.

            चार पुरुषार्थापैकी धर्म आद्य पुरुषार्थ! प्रत्येकजण धार्मिक आहे. नास्तिक सुद्धा एक धर्मच आहे. धर्म म्हणजे विचार धारण करणे होय. कोणत्याही धर्मातील मूलतत्वांचे चिंतन-मंथन केले असता त्या धर्माला चिकटलेले थोतांड-कर्मकांड गळून पडतात आणि मग शिल्लक राहतो तो निखळ-निका विचार! तोच खरा धर्म! डॉ.बोराडे हे मुळात जैन धर्मीय नसले तरी ते एक चिंतनशील सृजन आहेत. 'तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान' लिहितांना डॉ.बोराडेंना आपल्या भोवतालच्या जैन लोकांच्या व्यासंगाने जैन धर्म तत्वे, विविध तीर्थंकर आणि त्यातील शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान यांच्या कार्य-कर्तृत्वाविषयी कुतूहल निर्माण झाले. प्रस्तुत ग्रंथ एकूण पाच प्रकरणामध्ये लिहिलेल्या ग्रंथास व्यासंगी संशोधक प्रा.डॉ.विजय पाटील यांचा महत्वपूर्ण अभिप्राय, सुप्रसिद्ध कवयित्री सुनंदा शिंगनाथ यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि श्री मिलिंद काटे यांनी विवेकशिल चिंतनाने केलेली पाठराखण हे या पुस्तकाचे महत्वपूर्ण भाग आहेत.

            डॉ.बोराडे हे विद्यावाचस्पती आणि संशोधक मार्गदर्शक आहेत. त्यांचा लेखन-संशोधन कार्याचा दांडगा अनुभव इथे दृगोचर झाल्याशिवाय रहात नाही. त्यांची अगोदरची पुस्तके आणि विविध प्रस्तावना पहिल्या असता ते एक उत्तम चित्र-चरित्रकार, संशोधक आहेत. त्यांनी जैन धर्मातील महत्वपूर्ण ग्रंथ आणि वेबसाईटवरील लेखनाचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. पहिल्या प्रकरणात जैन धर्माचा इतिहास लेखन करतांना त्यांनी मानवाच्या उत्पत्तीपासून, सिंधू संस्कृती ते कुलकर किंवा मनु पर्यंत विश्लेषण करतांना जैन धर्मातील चोवीस तीर्थंकर, बारा चक्रवर्ती, नऊ बलभद्र, नऊ वासुदेव वगैरे बाबींचे चित्रण केले आहे. जन म्हणजे सामान्य लोक, जैन म्हणजे जैन धर्माच्या मार्गाने चालणारा आणि जीन म्हणजेच स्वतःच्या इंद्रियांना जिंकणारा. ही जीं धर्मातील सर्वोच्च अवस्था आहे. "ज्या जीवाचे मानसिक, वाचिक, कायिक विचार-व्यवहार शुद्ध आहेत. तो व्यक्ती धर्म किंवा मतभेद विरहीत जीन होतो" असे लिहून बोराडे, जैन धर्म हा एक शाश्वत धर्म आहे असे सांगतात. त्यानंतर बोराडे सर्वच चोवीस तीर्थंकाराच्या यादीतील प्रथम तीर्थंकर ऋषभदेव, आदिनाथ यांची माहिती देतात. हकार, मकार आणि धिक्कार नीतीचा उल्लेख इथे आहे. तसेच ७२ कला, ६४ विद्या, १८ अंकलिपी, पात्र, औजारे, वस्त्र, चित्र आदि शिल्पांचा, व्यवसाय, व्यवहार, मृत व्यक्तीला दाह देणे इत्यादी बाबी ऋषभदेव यांच्याच काळात प्रारंभ झाल्याचा उल्लेख इथे आहे. नृत्यांगना निलांजनाच्या अचानक मृत्यूने ऋषभदेव जागृत झाले आणि भाऊ बाहुबलीकडे राज्य सोपवून सर्वसंग परित्याग करून ते तपश्चर्येला निघून गेले. त्यानंतर उर्वरित तीर्थंकारांची यादी देऊन बोराडे सर जैन धर्माची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये स्पष्ट करतात. माणसातच देव आहे, अनेकांत सिद्धांत, औदार्य, अहिंसा, कर्म मुक्ती देणारा जैन धर्म आहे. सहनशिल, संयम, सहकार्य, सहअस्तित्व, श्रमण, आनंदी व्यावहारिक जीवन, अध्यात्मिक चेतना इत्यादी शिकवण देणारा जैन धर्म आहे. याशिवाय अहिंसा परमो धर्म, स्यादवाद, पंचमहावृत्ते, तीन गुणवृत्ते, चार शिक्षावृत्ते आणि जैन धर्मातील पंथाचे विश्लेषण इथे आले आहे. त्यानंतर भगवान महावीर यांचे जीवन-चरित्र-कार्याचा विस्ताराने उल्लेख आहे. इथे मात्र महावीरांचे कार्य आणि तत्वज्ञान विस्ताराने देण्याऐवजी बोराडे सरांना महावीरांच्या जन्म-जीवनातील विविध मिथकांनी आकर्षित केले आहे. त्यांची दीक्षा, साधना, भ्रमंती, केवळ ज्ञान कल्यानक, पहिली धर्मदेशना (उपदेश), पहिले प्रवचन, समवसरण, मोक्ष कल्याणक आदि प्रसंगांचे विस्ताराने विवेकशील चिंतन वाचायला मिळते. शेवटच्या प्रकरणात भगवान महावीरांचे तत्वाचरण यावर लिहिले असून त्यानंतर महावीर वर्धमानानंतर जैन धर्मात काय काय स्थित्यंतरे झाली त्यात सहा आचार्य, तीन मुख्य परंपरा, आणि काही ऐतिहासिक तथ्ये मांडतांना भारतभर, जगभर जैन धर्म आपल्या अनमोल तत्वांनी कसा सर्वमान्य झाला याचे विवेचन आले आहे. शेवटी जगभरातील २३८ जैन तीर्थ आणि संदर्भ सूचीने हा संक्षिप्त ग्रंथ थांबतो.

            सज्जन बंधू-भगिनींनो, सांप्रतकाळी क्रोध, असहिष्णुता, असहकार, कट्टरता, उतावीळपणा वाढल्यामुळे माणसामाणसातील संवाद खुंटला आहे. तेंव्हा शांती, सहकार, प्रेम, वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळा, सहिष्णुतेची जगाला नितांत अवश्यकता असून त्यासाठी जैन धर्माच्या शांती, अहिंसा, सहकार, सहअस्तित्व, सन्मान इत्यादी वैश्विक तत्वांची समाजात पुन्हा रुजवणूक होण्याची नितांत आवशकता आहे. त्यासाठी डॉ.बाबा बोराडे सर लिखित, अनुराधा प्रकाशनाने प्रकाशित केलेला 'तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान' हा छोटासा ग्रंथ प्रत्येकाने वाचून नक्की संग्रही ठेवावा व आपल्या जीवनात रुजवावा. जय जिनेंद्र!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये

कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ

जि. परभणी (महाराष्ट्र)

मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)


Comments

Popular posts from this blog

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

फुल!

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!