प्रज्ञावंत प्रेणास्त्रोत: शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे भोसले !
प्रज्ञावंत प्रेणास्त्रोत: शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे भोसले !
मोठ्या
झाडाखाली लहान झाड वाढत नाही! हवा-सूर्यप्रकाश अभावाने त्याची वाढ खुंटते, परंतु
काही झाडं ही आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आपली वाढ खुंटू देत नाहीत! हाच
निसर्ग नियम माणसांच्या बाबतीत सुद्धा आहे. मोठ्या माणसांची संतती आपल्या
पूर्वजांच्या कार्य-कर्तृत्वाला न्याय देवू शकत नाही किंवा आपल्या वाड-वडिलांच्या
किर्तीमानाखाली त्यांचे अस्तित्व नगण्य होते, परंतु यालाही काही युगपुरुष अपवाद
आहेत! जेंव्हा संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य-कर्तृत्वाने
प्रकाशमान झालेला असतांना, आपल्या वडिलांसोबत अनेक मोहिमांमध्ये सहभागी झालेले
शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी अगदी आपल्या वडिलांची मिराशी मोठ्या
ताकदीने पुढे नेली आणि भोसले घराण्याच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी राजे भोसले हे नाव सुद्धा
इतिहासकारांना सुवर्णाक्षरांनी लिहायला भाग पाडले!
जिजाऊ मांसाहेब यांनी छत्रपती शिवारायांसारखे
नररत्न घडवून आपला लाडका नातू बाल शंभूराजे यांच्यावर देखील मुलगामी, परिणामकारक
संस्कार करून त्यांना छत्रपती शिवराय यांचे शेष कार्य करण्यास मजबूत केले. संभाजी
राजांचे मातृछत्र लवकर हरवल्यामुळे जिजाऊ मांसाहेबांनी आपल्या वात्सल्याने बाल
शंभूंचे संगोपन मोठ्या जबाबदारीने करतांना कधी आईची आठवण येणार नाही याची खबरदारी
घेतली. छत्रपती शिवरायांना संत तुकोबांचा सहवास लाभल्यामुळे वारकरी संप्रदायाचे
संस्कार बाल शंभूवर खोलवर रुजले गेले. त्यांना स्वराज्याचा वारस या नात्यानेच नाही
तर भविष्यात ते एक योद्धा, शूरवीर महापुरुष म्हणून स्वतःचे नाव आपल्या
वडिलांसारखेच तेजोमय करतील असेच त्यांच्यावर संस्कार झाले. भारतीय संस्कृतीची
मूल्ये, रामायण-महाभारत महाकाव्यातील जीवनतत्व, म्हणजेच शस्त्रांबरोबर शास्त्रांचेही
ज्ञान बाल शंभूंना देऊन एक दूरदृष्टी तारुण्याकडे वाटचाल करणारा बलदंड योद्धा
बनवले!
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला
उत्तराधिकारी न नेमता ते जात राहिले. याचा मात्र दूरगामी परिणाम युवराज संभाजी
भोसले यांच्या जीवनावर झाला. राज्यकारभारात अनेक गट-तट पडले गेले. त्या
परिस्थितीला संभाजी महाराजांनी मोठ्या धैर्याने तोंड देऊन आपले राज्यपद मिळवले. या
दरम्यान, राजकीय स्वार्थापोटी जवळच्याच लोकांनी संभाजी राजांविषयी अनेक वावड्या
उठवल्या. त्यांचे नेतृत्व खुजे करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र नरवीर छत्रपती संभाजी
राजेंनी त्या सर्व क्लृप्त्या हाणून पाडल्या आणि आपले विलक्षण शौर्य, धैर्य आणि
पराक्रम दाखवून दिला. त्यांच्या काळात धर्मक्षेत्रांत वैदिक आणि शाक्त या दोन
पंथात कट्टर संघर्ष सुरु होता. त्याचाही काही प्रमाणात प्रभाव त्यांच्या जीवनावर
झालेला दिसून येतो, परंतु संभाजी महाराजांनी कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही.
राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यावर विविध देवस्थाने, मठ, संतपुरूष यांना मोईन
सुरु करून संत-महतांचा सन्मान केला. संत तुकोबांच्या निर्वाणानंतर त्यांची पत्नी
आणि मुलगा महादेव यांना त्यांची जमीन परत मिळवून दिली आणि महादेवाला अधिकृत
वर्षासन लावून दिले. छत्रपती संभाजी राजांनी कोणत्याही धर्माच्या साधू-संत-महंत
यांचा अपमान केला नाही. कराड, कांदळगाव येथील भट-ब्राह्मण आणि गोसाव्यांना जमीन
आणि वर्षासन सुरु केल्याच्या नोंदी इतिहासांत सापडतात. विशेष म्हणजे पंढरपूरच्या
वारीला संरक्षण देऊन आपल्या वडिलांची वारकरी मिरासी छत्रपती संभाजी राजांनी चालवली
ही अत्यंत गौरवाची बाब त्यांच्या जीवनकार्यात दिसून येते. त्याचबरोबर चापळ येथे
भरणाऱ्या रामनवमी यात्रेला संरक्षण देण्याचे कार्य सुद्धा छत्रपती संभाजी
महाराजांनी केलेले दिसून येते. हे करत असतांना मुस्लीम राजांशी त्यांचा संघर्ष
होता, मात्र त्यांनी मुस्लीम धर्म आणि धार्मिक स्थळांना कुठेही हानी पोहचवली नाही
किंवा कोणत्याही मौलवींचा अवमान केला नाही, याचे कारण म्हणजे संत तुकारामांचे
"कोण्याही जीवाचा न घडो मत्सर l वर्म सर्वेश्वर पूजनाचे ll" हे वारकरी
संस्कार छत्रपती घराण्यांत पूर्वापार चालत आले होते !
छत्रपती संभाजी राजांची ही सर्व
दैदिप्यमान, सहिष्णू राजकीय कारकीर्द पाहत असतांना त्यांचे वाङ्मययीन योगदान पाहून आज आपण अक्षरशः
थक्क होतो ! 'बाप से बेटा
सवाई' उक्तीप्रमाणे छत्रपती संभाजी राजांनी 'बुद्धभूषणम' हा विद्वत्प्रचुर संस्कृत
ग्रंथ लिहला. अफाट मुघल सैन्याशी मोठ्या धैर्याने-शौर्याने लढणारे शूरवीर संभाजी
महाराज आपली विद्वत्ता या संस्कृत ग्रंथातून दाखवून देतात. आपले पिताश्री छत्रपती
शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्याचा गौरव छत्रपती संभाजी महाराज आपल्या 'बुद्धभूषणम'
ग्रंथांत
'कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः
।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥
असे वर्णन लिहून आपल्या वडिलांची कीर्ती
दैदिप्यमान करण्याचे महत्कार्य त्यांनी केले. याशिवाय 'नायिकाभेद', 'नखशिखा', 'सातशतक'
हे तीन ग्रंथ लिहून त्यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेची ओळख वाङ्मयात निर्माण केलेली
दिसून येते.
छत्रपती
शिवाजी महाराजांचे प्रज्ञावंत पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची आज आपण जयंती साजरी
करत असतांना काही मुलभूत बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. छत्रपती शिवाजी
महाराजांसोबत जेंव्हा बाल शंभू आग्रा येथे वडिलांसोबत कैद झाले तेंव्हा ते केवळ ९ वर्षांचे
होते आणि वडिलांसोबत राहून आपली सुटका करून घेतात ! यावरून सहज लक्षात येते की;
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला घरांत न ठेवता सोबत घेऊन खंबीर-मजबूत
बनविले. वेळप्रसंगी हा बाप मुलाची आई झाला असेल ! नऊ वर्षांचे बाल संभाजी तिथेच
खऱ्या अर्थाने मजबूत झाले ! "जी माणसं मनाने बळकट असतात तिच माणसं शरीराने
सुद्धा बलदंड-बळकट होऊ शकतात" याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवपुत्र छत्रपती
संभाजी महाराज ! जेमतेम ३२ वर्षे जीवन आणि ९ वर्षे राज्यकारभार लाभलेले शूरवीर छत्रपती
संभाजी महाराजांचे कार्य सर्वच सामान्य-असामान्य लोकांचे आजही डोळे दिपवून टाकतात
! आज तरुणांनी शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांचा डीपी, स्टेट्स ठेवून किंवा
छत्रपती संभाजी महाराज की जय ! असा जयघोष करायलाच पाहिजे, मात्र एवढ्यावर थांबून
चालणार नाही ! प्रत्येक बापाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि प्रत्येक तरुणाने
छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श ठेवून जीवनात वाटचाल करावी लागेल!
वर्तमानाला
अक्षरशः दारू, गुटखा, तंबाखू या जीवघेण्या व्यसनांनी विषारी विळखा घातला आहे !
शिवाय आज महापुरुषांच्या विचारांचे पाईक
होण्याऐवजी सर्वत्र त्यांच्या जातीचा-धर्मांचा खोटारडा जल्लोष सुरु आहे ! महापुरुष
हे कालातीत-धर्मातीत असतात याचे भान समाजाने ठेवले पाहिजे ! त्यांना जात-धर्म-पंथ-वर्ण-रंग
यात गुंतवणे म्हणजे, ते महापुरुष लहान करणे होय ! चला तर मग, आज छत्रपती संभाजी
राजांच्या जयंतीदिनी आपण शपथ घेऊ की; आपण निर्व्यसनी राहून, आई-वडील आणि देश यांची
सेवा करून "मी प्रथम आणि शेवटी भारतीय आहे" हा विचार मनात खोलवर रुजवून
घेऊन स्वतःचे जीवन कृतार्थ करूयात ! असे झाले आणि संपूर्ण तरुण सन्मार्गाने,
विवेकाने वर्तन करून व्यायाम-ज्ञानार्जन करायला लागला की; आपला भारत देश "बलदंड
तरुणांचा देश" म्हणून आणखी शंभर वर्षे ओळखला जाईल ! असे झाले की निश्चितपणे
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा आनंद होईल ! तेंव्हाच
खऱ्या अर्थाने त्यांची जयंती साजरी होईल अन्यथा केवळ इव्हेंट ! छत्रपती संभाजी
महाराज की जय !
प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ जि.परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक,
योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

Comments
Post a Comment