सदैव आनंदाचा सोपा राजमार्ग!

 


सदैव आनंदाचा सोपा राजमार्ग!

        स्वतः साठी जसे आहात तसेच रहा.  कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार.  म्हणून लोकांचा विचार करत जावू नका. वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतंच नाही. आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो. संघर्षाकडे पाठ फिरवू नका तर त्याला सहप्रवासी बनवा. आयुष्य आणि पुस्तकातले व्याकरण सारखेच असते. शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्याच बिघडतं. डोक्यावरील मनातील सर्व भार ईश्वरावर सोपवा व दिवसभरात ज्यांनी मदत केली त्यांना धन्यवाद द्या. ज्यांनी त्रास दिला त्यांना मोठ्या मनाने माफ करून बिनधास्त झोपा. बघा किती छान झोप लागेल व उद्याची सकाळ नव्यानेच प्रसन्न अनुभवयास मिळेल. मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारा मोठा दृष्टिकोन ठेवा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होणार नाही. उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच दिसतात पण दोघात फरक एवढाच आहे कि उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो. वाईट कोणीच नसतं जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो. मनाचा गाभारा तृप्त असेल तर बुध्दीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या हिताची वा भल्याची प्रार्थना करणाराच असतो.काही काही सत्कर्म अशीही करावीत की ज्याचा साक्षीदार देवा शिवाय दुसरा कोणीच नसावा. प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टाच होते मग त्याला विरोध होतो, शेवटी त्याच विचारांचा स्वीकार होतो. समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. रस्त्याच्या मार्गावर अपघात झाला तर कदाचित औषध गोळ्या घेऊन उठून उभ राहता येत पण जगण्याच्या मार्गावर विश्वासघात झाला तर माणूस आयुष्यातून उठतो. त्यामुळे जीवनात सर्व काही करा पण कोणाचा विश्वासघात करू नका. ज्याला धन कमवायचे आहे त्याने कण सुद्धा वाया घालवू नये आणि ज्याला  ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षण सुद्धा वाया घालवू नये. निवड संधी आणि बदल या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतो. संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की, परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. एकमेकांना धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं. भीती पेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही. आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते. एखादा माणूस जाता-जाता जेंव्हा आपल्याला अपेक्षित नसलेली कमेंट करतो तेंव्हा त्याचं नवल वाटतं पण केंव्हा तरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडून बसण्याचा क्षण येतो तेंव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात. आयुष्यात ज्याच्याकडे आनंद असतो त्याच्याकडे पैसा नसतो आणि ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे आनंद नसतो. आपल्या कडून केलेल्या कृतीच्या परिणामांची चिंता करणार्‍यांच्या हाती कधीच निराशा लागत नाही. तुमच्याकडे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारा एक असा व्यक्ती असावा जो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरुन उरेल!

Comments

Popular posts from this blog

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

फुल!

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!