कृतीशील समाजसुधारक: श्री संत गाडगेबाबा
कृतीशील
समाजसुधारक: संत गाडगेबाबा
महाराष्ट्राची
वैविध्याने नटलेली समृद्ध, बहुआयामी सर्वश्रुत संस्कृती अनेक विचारवंत
समाजधुरिणांच्या कृतीपरायण कार्यशैलीने झळाळून निघाली आहे ! निश्वार्थी प्रेम,
त्याग आणि त्याला कृतीशील विचारांची जोड देऊन महाराष्ट्र आचार-विचार संपन्न राज्य
म्हणून नव्या विश्वात आपली वेगळी ओळख कायम टिकवून आहे! अनेक विचारवंत, समाजसुधारक
आणि विविध धर्म, संप्रदायातील संतांनी येथील पावन भूमीला आपल्या समाजोद्धारक
कार्याने सिंचित करून नव्या विचारांची कृतीशील जोड देऊन महाराष्ट्राची कीर्ती
गगनाला भिडवली आहे ! अशा महान कृतीशील, समाजशील संत-विचारवंतापैकी एक कृतीशील समाजसुधारक
संत म्हणजे संत गाडगेबाबा ! गाडगेबाबा हे नावच त्यांच्या संपूर्ण कार्यशैलीची उत्तुंग
ओळख आहे ! महाराष्ट्राची त्यागाची आणि निश्वार्थी कार्यसंस्कृतीची ओळख अनेक
संतांनी आपल्या कृतीने जगाला दाखवून दिली आहे आणि त्याचा वसा आणि वारसा घेऊन संत
गाडगेबाबांनी उच्चकोटीचे दैदिप्यमान कार्य केलेले आपणांस दिसून येते !
संत विटप सरिता गिरी धरणी । परहित हेतु सबन्हकी करणी ।।
या सुभाषिताप्रमाणे संतांचे कार्य हे वृक्ष, नदी, पर्वत आणि
पृथ्वीप्रमाणे अखंड, अविरत चालत असते. वृक्ष स्वतःची फळे खात नाही, नदी पाणी पीत
नाही, पर्वत अविचल सेवेकरिता उभेच आहेत, पृथ्वी सर्वांचे भरण पोषण करते
त्याचप्रमाणे खरे संत वृक्ष, नदी, पर्वत आणि पृथ्विसम अहोरात्र समाजोत्थान
करण्यासाठी कष्टत असतात. त्या संतांपैकीच एक कृतीशील संत म्हणजे संत गाडगेबाबा ! संत
ज्ञानोबा तुकोबा आदि वारकरी संतांनी आपल्या अनुभूतीपूर्ण ज्ञानाच्या आधारे लोकांचे
प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतांना तत्कालीन व्यवस्थेने त्यांना जंग जंग
पछाडले. त्यांना मुक्तहस्ते लिहू दिले नाही की कार्यही करू दिले नाही.
वर्णव्यवस्थेच्या बेड्यांनी त्यांना जखडून ठेवले गेले. परंतु १९ व्या शतकाच्या
उत्तरार्धात परिट (धोबी) समाजात जन्मलेल्या गाडगेबाबांनी आपल्या पूर्वजांच्या
विचारांचा ठेवा अमलात आणायचे ठरवले.
गाडगेबाबा
म्हणजे डेबुजी झिंगराजी जाणोरकर. झिंगराजी परिट काम करून आपला संसार चालवत, मात्र
त्यांना व्यसनांनी घेरले आणि दारूच्या व्यसनापायी ते तडफडून डेबुजी समोर मेले !
दारूपायी आपल्या घराची झालेली धूळधाण पाहून डेबुजी अस्वस्थ झाले. यासाठी आपण
काहीतरी केले पाहिजे असे तेंव्हाच मनोमन ठरवले. घरची गरिबी असल्यामुळे डेबुजी आणि
त्यांची आई मामाच्या दापुरा गावी गेले. तिथे डेबुजींनी गुरे सांभाळण्याचे काम
केले. हे करत असतांना त्यांच्या मनात दारू विषयी प्रचंड चीड निर्माण झालेली होती.
तत्कालीन समाजव्यवस्थेत श्रीमंत-प्रस्थापित लोक गोर-गरीब लोकांची पिळवणूक करत होते.
समाजामध्ये देवभोळेपणा प्रचंड वाढला होता. लोकांना खरा देव कुठे आहे (?) हे कुणीच
सांगायला तयार नव्हते. गुरे सांभाळत असतांना डेबुजीचं लग्न झालं. दोन मुली, दोन
मुलं झाली. पण डेबुजी ज्या गावांत रहायचे तिथे प्रचंड जातीभेद होता. त्यांना ते पहावत
नसे. म्हणून ते आता शेतावर झोपायला जाऊ लागले. तिथेच भजन म्हणू लागले. पुढे
तुकोबांना आदर्श मानून गावागावात कीर्तन करायला सुरुवात केली.
गाडगेबाबांचे
कीर्तन म्हणजे एकदम आधुनिक कीर्तन ! गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ! ने सुरु
होणारे कीर्तन लोकांना हलवून जायचे. कोंबडे-बकरे कापणे, बळी देणे, दारू पिणे यावर
डेबुजी घणाघात करू लागले.
जे का रंजले गांजले तयांशी म्हणे जो अपुले
तोची साधी ओळखावा देव तेथेची जाणावा
या तुकोबांच्या अभंगाप्रमाणे डोक्यावर मडकं आणि अंगावर गोधडी घेऊन
डेबुजी गावोगाव लोकांचे प्रबोधन करत फिरू लागले. गावात जायचे, स्वच्छता करायची,
गाव झाडून काढायचे आणि सायंकाळी भिक्षा मागून जेवण करायचे. गाव झाडतांना 'आज
आपल्या गावात कीर्तन है' असं म्हणून सायंकाळी त्यांचेच कीर्तन सुरु व्हायचे. ते
कीर्तनात लोकांना अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, आई-वडील सेवा इत्यादी विषयावर प्रबोधन
करायचे आणि गावातून निघून जायचे.
त्यांची आणि
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झालेली
सर्वश्रुत आहे. आता त्यांना लोक गाडगेबाबा किंवा गोधडीवाले बाबा म्हणून ओळखू
लागले. त्यांचे कीर्तन सर्वत्र प्रसिद्ध झाले. १९५५ साली पंढरपूर येथे संत संमेलन
भरले असता तथाकथीत वारकरी संतांना संत गाडगेबाबांनी परखड प्रश्न विचारून अनुत्तरीत
केले होते. वारकरी सांप्रदायात घुसलेला भेदाभेद त्यांना समूळ नष्ट करायचा होता.
संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी घालून दिलेला वसा आणि
वारसा त्यांना पुढे चालवायचा होता. 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म' हा मुल विचार
घेऊन वारकरी सांप्रदाय चालला पाहिजे अशी त्यांची तळमळ होती. त्यांनी आपल्या उभ्या
हयातीमध्ये अनेक समाजोपयोगी कामे केली. पूर्णा नदीवर घट बांधला. गोरक्षण शाळा,
धर्मशाळा, विद्यालये बांधून समाजाची सेवा करण्याचा अहोरात्र प्रयत्न केला. शेवटी
१९५२ मध्ये गाडगेबाबा मिशन
स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे
गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात." म्हणजे गाडगेबाबांची कीर्ती सर्वदूर पोहोचली
होती. बाबा सामान्य लोकांना प्रिय झाले होते, वंदनीय झाले होते.
आज वारकरी
सांप्रदायात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आदि संतांप्रमाणे
संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी बाबांचा वसा आणि वारसा चालविणारे कीर्तनकार
प्रबोधनकार होणे अपेक्षित आहे. 'जेथे करावे कीर्तन, तेथे सेवू नये अन्न' ह्या
तुकोबांच्या उक्तीप्रमाणे जरी वर्तन शक्य नसले तरी एका कीर्तनाचा एक लाख, पन्नास
हजार, वीस हजार असा भाव होत असेल तिथे 'खरी भक्ती आणि भाव काय असेल (?)' हा प्रश्न
मला नेहमी पडत असतो. आज सर्वत्र पैशाने थैमान माजवले आहे. एक रुपया न घेता हजारो
मनावर अधिराज्य गाजवणारे गाडगेबाबा आज दिसत नाहीत. कीर्तनं वाढले परंतु भक्ती आणि
श्रद्धेचा ऱ्हास झाला. वारकरी सांप्रदायात आज थोडे परिवर्तन होऊन खऱ्या अर्थाने अर्थार्जनावर
मर्यादा येऊन प्रबोधन होणे अपेक्षित आहे. तसेच जे समाज सुधारक, राजकारणी आणि इतर
सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या लोकांनी संत गाडगेबाबांचा वसा आणि वारसा पुढे
नेऊन देशातील शेवटच्या माणसाचे उत्थान करण्याचा निखळ निका प्रयत्न करणे गरजेचे
आहे. असे झाले तरच आपला महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जाईल आणि आज संत
गाडगेबाबांची जयंती साजरी केल्याचे समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही !
प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याते, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम
प्रशिक्षक आहेत.)

अप्रतिम
ReplyDelete