व्हॅलेंटाईन डे: खास प्रेमाचा दिवस: शतदा प्रेम करावे!
शतदा प्रेम करावे!
प्रेम ! जन्म म्हणजेच प्रेम ! प्रेम, एक अलौकिक, नितांत सुंदर अलंकार ! प्रेम, संपूर्ण जगाला गुण्यागोविंदाने जगण्यासाठीचा एकमेवाद्वितीय वैश्विक महामंत्र ! आईच्या उदरातून विश्वात आल्यानंतर घेतलेला पहिला श्वास, आईं आणि जगाशी घट्ट नाळ जोडणारा ईश्वरी शब्द म्हणजे प्रेम ! प्रेम म्हणजे हृदयविण्यावर छेडला जाणारा नितांत सुंदर झंकार ! शांत, निळ्याशार पाण्यांत एक छोटासा दगड टाकल्यानंतर निर्माण होणारी हजारो रंगीबेरंगी वलये म्हणजे प्रेम ! माणसाला जगण्याची आणि अस्तित्वाची उर्मी देणारे महाऔषध म्हणजे प्रेम ! प्रेमाचा कुठलाही दिवस किंवा प्रसंग असूच शकत नाही, संपूर्ण जग आज चलनवलन करत आहे तेही केवळ प्रेमापायीच ! प्रेम हा शब्द जगांतून वजा केल्यास काहीच शिल्लक राहणार नाही, जग म्हणजेच प्रेम ! गायकाने सुंदर आलाप घेऊन एखाद्या कवीचे शब्द आसमंतात सर्वदूर पोहचवून प्रेक्षक मंत्रमुग्ध करणे आणि त्यानंतर सहजतेने व्यक्त होणारा 'वा !' उद्गार म्हणजेच प्रेम ! कुंचल्याने काही रंग एकत्र करून कॅनवासवर अप्रतिम चित्र चित्रित करणे आणि ते चित्र पाहून प्रत्येकाला मनमुराद आनंद होणे म्हणजे प्रेम ! आईच्या मांडीवर हसणारं, खेळणारं गोंडस बाळ म्हणजे प्रेम ! पहिल्या पावसानंतर येणारा अवीट मृदगंध म्हणजे प्रेम ! ग्रीष्माच्या गर्मीने लाहीलाही झालेल्या अंगावर पहिल्या पावसाचे थेंब पडून होणारा स्वर्गीय आनंद म्हणजेच प्रेम ! कडक उन्हातून चालून, थकून-भागून आल्यानंतर तृषार्त पांथस्तास माठातील थंडगार पाणी प्यायला मिळणे आणि तहान भागल्यानंतर होणारी अव्यक्त, तृप्त भावना म्हणजे प्रेम ! सुंदर, टवटवीत फुलांनी सजलेली बाग पाहिल्यानंतर मनात प्रचंड गोड स्वर्गभावना निर्माण होणं म्हणजे प्रेमच ! एखादी सुंदर लावण्यवती साजश्रुंगार करून लोकांमधून जातांना सर्वांनी निखळ सौंदर्याची मनातल्यामनात स्तुती करणे म्हणजे सुद्धा प्रेमच !
अनेक संत, कवी, लेखक आणि वक्ते हजारदा प्रेम व्यक्त झाले आहेत.
संतांनी आणि कवींनी अनेक अभंग आणि रचना प्रेमार्पण करून 'प्रेम'
शब्दाचे महत्व विषद केले आहे. 'प्रेम सुख देई
प्रेम सुख देई । प्रेमाविण नाहीं समाधान !' सुख आणि समाधान
पाहिजे असेल तर तिथे प्रेमच हवे ! प्रेम नसेल तर सर्वच ग्रंथ आणि सौंदर्य सुद्धा
निरर्थकच !
आज बदलत्या काळात विविध
संस्कृतींचा उहापोह होत असतांना वेगवेगळे 'डे' साजरे करण्याचा जो अट्टहास चालू आहे, त्यासाठी एखादा
नक्की दिवस कसा असू शकतो ? जो 'डे'
आहे त्या दिवशीच प्रेम व्यक्त करायचे आणि बाकी दिवस काय द्वेष-मत्सर
करत फिरायचे का ? प्रेम व्यक्त होण्यासाठी जगाला प्रथम प्रेम
समजून घ्यावे लागेल. प्रेम म्हणजे आकर्षण नव्हे ! 'एखादी
व्यक्ती किंवा वस्तू आपल्यालाच मिळावी हा दुराग्रह म्हणजे प्रेम' अशी प्रेमाची व्याख्या कधीच होऊ शकत नाही ! प्रेम ही एक नितांत सुंदर
निरपेक्ष भावना आहे, ती कधी व्यक्त होते तर कधी कधी अव्यक्त
असते ! प्राप्तीच्या आनंदापेक्षा अप्राप्तीचा आनंद जास्त ! प्रेम म्हणजे अशी भावना
जी माणसाला नित्य-नूतन विचाराकडे प्रवृत्त करते आणि मग एखादा अलौकिक विचार येणे
किंवा सर्वोच्च आनंद होणे म्हणजेच प्रेम ! जिथे अपेक्षा आली तिथे प्रेम संपते !
चला तर मग, आपणही प्रेम करायला शिकुया ! 'प्रेम म्हणजे फक्त
प्रियकर-प्रेयशी यांच्यातील प्रेम' असा संकुचित अर्थ
प्रेमाचा होऊच शकत नाही ! प्रेम ही एक अशी सुंदर विचारधारणा आहे, जी प्रत्येकाला जगायला उर्जा देते ! प्रत्येक क्षणी प्रेमभावना हृदयी घेऊन
जर आज माणूस वर्तन करायला लागला तर सर्वच माणसांचे आजार बंद होतील ! प्रेम ही
मनाची अशी सुंदर भावना आहे, कि जी भावना घेऊन आपण जगलो तर
कुठेच अडथळ्यांची शर्यत पार करण्याची गरज पडणार नाही ! आपलं लक्ष म्हणजेच प्रेम हा
महामंत्र आपण उरी बाळगून मार्गक्रमण केलं पाहिजे ! म्हणूनच जेष्ठ कवी कुसुमाग्रज
आपल्या कवितेते लिहितात,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं
असं 'एकलक्ष' प्रेम आज आपणा सर्वांनाच जीत-जागतं ठेवणार
आहे आणि तोच विचार रुजला पाहिजे ! हीच प्रेम भावना आज तरुणांमध्ये प्रज्वलित होणं गरजेचं आहे. वाचन, चिंतन, मनन ह्या गोष्टी
तरुणांमध्ये आज पुन्हा रुजविण्याची वेळ आली आहे. आज तरून पुस्तकं वाचत नाही कि;
लिहीतही नाही. तेंव्हा तरुणांनो, उठा आणि
आपल्या ध्येय्य, उद्दिष्टांप्रती सजग व्हा ! काळ मोठा खडतर
आहे ! तात्पुरत्या आकर्षणाचा बळी होऊ नका ! मृगजळ मृगजळच असते, त्याने तहान भागत नसते ! दूरचा विचार करा ! आपल्या भोवतालच्या लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
अहोरात्र प्रयत्न करा ! आपले आई-वडील आपल्यावर निरपेक्ष आणि नितांत प्रेम करत
असतात याचे भान असू द्या ! त्यांचे प्रेम समजून घ्या, त्या
प्रेमाला उत्तराई होण्याचा प्रयत्न करत राहिलात; कि तुम्ही
योग्य आणि प्रेमाच्या वाटेवर चालत आहात असे समजायला हरकत नाही !
प्रेम म्हणजे प्रेम असतं l
तुमचं आणि आमचं सेम असतं ll
चला तर मग, साजरा करूया आपल्या प्रेमळ जन्माचा सोहळा ! माती-माता यांच्याशी कृतज्ञ
राहून रोजचं जगणं प्रेममय, सुंदर करून आपला क्षण-क्षण
प्रेमाने ओतप्रोत भरून सर्वत्र प्रेमभावनांचा वर्षाव करून सर्व जगच एका सुंदर अशा
प्रेमभावनेच्या नेटवर्कने जोडून टाकूयात ! असे झाले कि सर्वत्र 'प्रेमाची गंगा' वहायला लागेल आणि माणूस आनंदाने,
प्रेमाने शेवटचा प्रेमश्वास सोडून आपली जीवनयात्रा प्रेमाने पूर्ण
करून विश्वाचे आभार मानेल ! हीच एक माफक अपेक्षा !
प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम
प्रशिक्षक आहेत.)

अप्रतिम.. लेखन
ReplyDelete