क्रिकेटचा सामना हरलोय, युद्ध नाही!

 


क्रिकेटचा सामना हरलोय, युद्ध नाही !

        एक मराठी चित्रपट येऊन गेला, त्याचं शीर्षक होतं 'येडयाची जत्रा'. आज आपली सर्वांची अवस्था म्हणजे जणू येड्यांच्या जत्रेसारखी झालेली आहे. चित्रपटांत लेखक-दिग्दर्शकांना जो संदेश द्यायचा तो राहिला बाजूला आणि अक्षरशः आज लोक वेडे झाले झाले वेडे ! माणसाला कशाचं वेडं लागावं ? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात देशातील तरुणांना कशाचं वेड लागलं पाहिजे ? ध्येयाचं, यशस्वी होण्याचं, बुद्धिमान, बलशाली, कीर्तिमान आणि महापुरुष्यांच्या चरित्र वाचनाचं, वचनांचं वेड लागणं अपेक्षित आहे. एकेठिकाणी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंद म्हणतात, "हे वीर युवकांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. राष्ट्राला युवा चेतनेची आवश्यकता आहे. उठा स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा हाच क्षण आहे. जोवर तुम्ही थकलेले नाहीत तोवर निश्चय करा. श्रेष्ठ आदर्श डोळ्यासमोर ठेवा. आदर्शासाठी सर्व समर्पण करा." हा दुर्दम्य आशावाद आणि हीच नवचेतना घेऊन देशाचा तरूण मार्गस्थ झाला पाहिजे. असेच तरुण देशाला तारुण नेऊ शकतात. परंतु आज भोवताल काय पाहतोय आपण ?

            काल दिनांक २४ ऑक्टोबर रविवार रोजी भारत-पाकिस्तान या दोन देशाच्या क्रिकेट टीमच्या दरम्यान २०-२० विश्वचषकातील भारताचा पहिला सामना होता. काही गोष्टी अद्भुत आणि अनाकलनीय अशा पाहायला मिळाल्या. दोन दिवसांपासून सर्वत्र मिडीयावर एकच हेडलाईन 'भारत-पाकिस्तान' मध्ये रंगणार महायुद्ध ! विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना न हरलेला भारत कसा खेळ करणार ? वगैरे वगैरे ...' सगळीकडे वातावरण ढवळून गनिघालं. क्रिकेट कळतं ते पण अन नाही कळत ते पण वेडे झाले ! कुणाला कुणाचा मेळ नाही. कामात लक्ष नाही कि खाण्यात लक्ष नाही. या काळातच मी रविवारी दिवाळीचा किराणा आणण्यासाठी सायंकाळी सात वाजता घराबाहेर पडलो आणि मला एकावर एक धक्केच बसायला लागले. सोनपेठच्या PWD च्या रस्त्यावरील धक्के तर मी गेली एकवीस वर्षे झाली खातोय पण आज रस्त्याबरोबर मनाला पण धक्के बसत होते. कापड दुकानात गेलो आणि रुद्राला विचारले, 'आज दुकानात शुकशुकाट कसा काय ?' तो म्हणाला, 'सर. आज भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आहे. आज नौकर सुद्धा आले नाहीत. ते पण घरीच थांबलेत. त्यामुळं ग्राहक पण नाही.' मी थक्क झालो. खचाखच भरून असणारं कापड दुकान अक्षरशः रिकामं होतं. तेथे खरेदी करून केदारच्या किराणा दुकानाकडे वळलो. तिथेही तोच प्रकार. एरवी फुल्ल गर्दीनं फुललेलं किराणा दुकानाचं काउंटर आज एकदम रिकामं रिकामं होतं. सहज केदारला विचारलं, 'आज गर्दी नाही ? नौकर पण दोनच दिसतात ?' तेंव्हा तोपण तेच म्हणाला, 'सर, आज भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आहे. आज नौकर सुद्धा आले नाहीत. ते पण घरीच थांबलेत. त्यामुळं ग्राहक पण नाही.' मी आवाक होऊन सर्वकाही पहात होतो. बाहेर रस्ता सुद्धा सामसूम झाला होता. सव्वा सात वाजताच मुख्य रस्ते लॉकडाऊन असल्यासारखे सुनेसुने झाले होते. बहुतांश दुकानं बंद होती आणि राहिलेली बंद होत होती. मी किराणा घेऊन घरी आलो.

            अक्षरशः माझं डोकं सुन्न झालं होतं. आजकाल क्रिकेट हा पूर्ण व्यावसायिक खेळ झाला असून सट्टेबाज आणि इतर काळेधंदे करणारांना हा खेळ म्हणजे पैसे कमावण्याचे कुरण झालेला आहे. खेळाकड खेळ म्हणून पाहणे गरजेचे असते. परंतु हा मिडिया, त्यावर जीवघेणा आणि किळसवाना सुरु असलेल्या प्रचार-प्रसाराने तरून पिढी पार रसातळाला नेऊन घातली आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, "तुमच्या देशातील तरुणांच्या ओठांवर कोणते गाणे आहे यावरून त्या देशाचे मी भविष्य सांगू शकतो." आता मात्र या खाजगीकरण-जागतिकीकरण आणि उदारीकरण (खा-जा-ऊ) धोरणाने सामान्य माणसाच्या जगण्याची पार वाताहत करून टाकली आहे. चोवीस तास बातम्या, ड्रग्स, गांजा, चोरी, दरोडे, खून, बलात्कार याचेच चित्र पुन्हा पुन्हा चर्वित-चर्वण करून लोकांना दाखवले जात आहे. आजचा तरुण मिडीयाचा बळी जात असतांना पाहून काळीज पिळवटून जाते. एक तरूण, अल्पवयीन मुलगा आपल्या बापाच्या छाताडावर बसून बापाचा खून करायला कचरत नाही. याचा अर्थ काय ? शाळेत शिकणारा मुलगा आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना नारळ पाण्यात विष देऊन मारण्याचे महाभयंकर दुष्कृत्य करतोय ! हे नेमकं कुठं शिकवलं जातं ? हा कशाचा परिपाक आहे ? कुठं गेल्या श्रावण बाळाच्या कथा ? कुठे आहे भगवान श्रीरामांचा आणि महात्मा गौतम बुद्धांचा आदर्श ? याचा विचार समाज कधी करणार ? करणार कि नाही ? असे एक ना अनेक प्रश्न आता समोर आ वासून उभे रहात आहेत.

            दुसरीकडे सर्व चळवळी जवळपास इतिहासजमा झाल्या आहेत. अति अर्थकेन्द्री जीवन, आणि झगमगाट यामुळे आता कुणी आंदोलने करत नाहीत. बहुतांश संघटना कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या सावलीला जाऊन आराम करत आहेत. त्या पक्षापुरतं आंदोलन करत आहेत, अगदी भाकरीपुरतं ! सर्व विद्यार्थी संघटनाही फक्त झेंडे धरण्यासाठी वापरल्या जात आहेत; हि अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून असेच होत राहिले तर शिक्षणाने माणूस समृद्ध होतो यावरचा लोकांचा विश्वास उडून जाईल. नीती, तत्व, श्रद्धा, विचार, प्रगल्भता इत्यादी गोष्टी जीवनात कालबाह्य होत असून त्या जागी 'बाबा गुगल कि जय हो !' म्हणून सगळा तरून वर्ग योग्य पाहण्याऐवजी अयोग्य पाहायला प्रवृत्त होतांना दिसत आहे. याचा अर्थ सर्वच तरूण, भरकटलेत, वाया गेलेत असंही नाही, मात्र दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढत आहे. हि धोक्याची घंटा तर नाही ना ? असे एक ना अनेक प्रश्न रोज सतावत असतात. या विचाराने मनात धस्स होते.  

          रात्री अकरा-साडेअकरा वाजता भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना संपला, आणि अपेक्षाभंग झाला. भारताचा पराभव झाला ! झालं ! सर्वच तरून, लहान-मोठे दर्शक नाराज ! काही जणांनी तर निराशेपोटी नक्की नशा केली असणार, तर काहीजण निराश होऊन झोपलेच नसावेत. मी त्या रात्री वाचन करत होतो, आणि सहज रात्री साडे अकरा वाजता मोबाईलवर Whatsapp आणि Facebook चे मेसेज पहिले असता, खूप लोक चाटिंग करत होते. भारतीय खेळाडूंना शिव्या घालत होते. चर्चा रंगल्या, वादविवाद झाले. हा पराभव रसिकांनी खूपच जिव्हारी लावून घेतला होता. परंतु, हे नकारार्थी वर्तन कितपत योग्य आहे ? एखादा सामना हरलो म्हणजे माणसानं एव्हढं भावनिक होणं कितपत योग्य आहे ? याचा विचार तरुण आणि इतर क्रिकेट रसिकांनी करण्याची गरज आहे. आपण पाकिस्तान सोबतचा क्रिकेटचा सामना हरलो म्हणजे जणू काही एखादे युद्धच हरलोय असा विचार करून जीवनात नैराश्य, चीडचीडेपणा, व्यसनाधीनता, आततायीपणा इत्यादी दुर्गुणांना वाव देणे कितपत योग्य आहे ? याचा विचार समाज आणि तरूण करणार कि नाही ? मित्रहो, आपण एक क्रिकेटचा सामना हरलोय, युद्ध नाही. क्रिकेट म्हणजेच सर्व काही नाही. क्रिकेट नक्की पहा मात्र स्पोर्ट्स स्पिरीट ठेवून ! खेळ म्हटले कि हरणं-जिंकणं आलंच ! एखाद्या संघाच्या विजयाची खुणगाठ मनाशी बांधून, पूर्वग्रह मनात ठेऊन तो सामना पाहणं म्हणजे दु:खाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

            मित्रहो, खेळ पाहण्याबरोबर आपण खेळ खेळले पण पाहिजे. रोज मैदानात घाम गाळला पाहिजे. नियमित व्यायाम करून शरीर बलशाली केले पाहिजे. मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळले पाहिजे. खिलाडूवृत्ती वृद्धिंगत करून विचार प्रगल्भ, आणि समृद्ध जीवन जगले पाहिजे. क्रिकेट सामन्याविषयी असलेली तळमळ किंवा निष्ठा आपण जर आपला अभ्यास, कर्तव्ये, व्यवसाय किंवा लिखाण यावर केंद्रित केली तर प्रत्येकजन स्वतःच्या जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने क्रिकेट एव्हढेच लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रित करणे गरजेचे आहे. तरुणांनी आपले जीवन सुंदर विचारांनी सजवले पाहिजे. जीवनाचे निखळ, नितांत सौंदर्य स्वकष्टाने सजवले पाहिजे. आपल्याला मिळालेला अमुल्य वेळ व्यर्थ गोष्टीमध्ये गुंतवून खर्च करण्यापेक्षा सार्थ गोष्टींवर लक्ष केंद्रित करून जगणं दैदीप्यमान केलं पाहिजे. तरुणांनी आपले आदर्श बदलले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, भगत सिंह असे महापुरुष आपले आदर्श असले पाहिजे. ज्याप्रमाणे डॉ.कलाम म्हणतात, "तरुण मित्रांनो, आपले मन असीम ध्येयाने प्रज्वलित करा. तुम्हाला जगाने कशासाठी लक्षात ठेवायला आवडेल ? त्यासाठी तुम्ही स्वतःला विकसित करून तुमच्या जीवनाचे तुम्हीच शिल्पकार बनावे लागेल. त्यासाठी एका कोऱ्या कागदावर तुमची स्वप्ने लिहा. त्यादृष्टीने कामाला लागा. मानवी इतिहासाच्या पुस्तकात ते पान कदाचित खूप महत्वाचं पान असेल. तेच इतरांना प्रेरणा बनेल यात शंका नाही !" आभाळा एव्हढ्या असीम ध्येयांनी प्रेरित होऊन आपले जीवन सुवर्ण अक्षरांनी लिहण्यासारखे अमुल्य बनवले पाहिजे. तरुणांनी आपले आई-वडील, वडीलधारी मानसं आणि शिक्षकांनी घालून दिलेल्या आदर्शावर मार्गक्रमण करून यशस्वी युवक बनले पाहिजे. खिलाडूवृत्ती जोपासणारा, बलदंड बाहुचा, उच्च ध्येय्याने पेटलेला तरून हाच उद्याच्या विकसित भारत देशाचा भाग्यविधाता बनले पाहिजे. हीच अपेक्षा आपण पूर्ण करावी, बस्स बाकी काही नको. 

  

प्रा.डॉ.विठ्ठल खं.जायभाये 

(व्याख्याता, कवी, कीर्तनकार, समीक्षक, लेखक, योग-प्राणायाम प्रशिक्षक)

कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ

जि. परभणी (महाराष्ट्र) 

मो. ९१५८०६४०६८         


Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. आदरनिय सर अतिशय सुंदर लेख!!आपले अभिनंदन आणि आभार!!💐💐

      Delete
  2. Eye opener post sir, we Indians waste valuable time in things good for nothing. Actually, our traditional sports are thousand times worth than these games, besides, they are affordable also. Unfortunate scenario in our country where generations are becoming of harmful habits and getting psychopaths....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

फुल!

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!